कल्याण ग्रामीणमध्ये कडकडीत लॉकडाऊन! जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश

रुग्णवाढीची संख्या कमी न झाल्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जाहीर केला आहे.

Updated: May 8, 2021, 09:35 AM IST
कल्याण ग्रामीणमध्ये कडकडीत लॉकडाऊन! जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश
representative image

कल्याण : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही अपेक्षित रुग्णवाढीची संख्या कमी न झाल्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जाहीर केला आहे.

कल्याण ग्रामीणमधील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. कल्याण ग्रामीण परिसरात कडक़डीत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतला आहे.

जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी त्यासंबधीचे आदेश काढले आहेत.  सोमवारी (ता.10)सकाळी 10 वाजेपासून ते 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे.

लॉकडाऊन कालावधीत फक्त दवाखाने आणि मेडिकल सुरू राहतील. किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरी, मिठाई आणि अन्न पदार्थांची विक्री करण्याऱ्यांना फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात 54 हजार नवीन रुग्णांची नोंद

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासांत 54 हजार 22 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 898 रूग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 37 हजार 386 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या 6 लाख 54 हजार 788 इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 74 हजार 43 जणांचा मृत्यू झाला आहे.