ठाण्यातले तलाव बनतायत मृत्यूचे सापळे

 तुर्भे तलावात गेल्या दोन वर्षात २५ ते २० बळी गेलेत. 

Updated: Jan 6, 2020, 09:38 AM IST
ठाण्यातले तलाव बनतायत मृत्यूचे सापळे title=

कपिल राऊत, झी २४ तास, ठाणे : ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. पण हेच तलाव आता मृत्यूचे सापळे बनत आहेत. ठाण्यात ब्रह्मांड परिसरातल्या तलावांत गेल्या दोन वर्षात पंचवीत ते तीस जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ठाण्यातल्या अजय सिंह यांचा मुलगा ब्रह्मांड परिसरातल्या तलावात पोहण्यासाठी गेला तो परतलाच नाही. अशीच परिस्थिती प्रकाश सांबरेकर यांच्यावर ओढवली. सांबरेकर यांचा मुलगा प्रथमेशचाही दोन वर्षांपूर्वी याच तलावात बुडून मृत्यू झाला. ठाण्यातल्या ब्रह्मांड परिसरात हा तुर्भे नावाचा तलाव आहे. या तलावात गेल्या दोन वर्षात २५ ते २० बळी गेलेत. 

तलावांचं शहर अशी ठाण्याची पूर्वापार ओळख. या शहरात एकेकाळी सत्तरच्या आसपास तलाव होते. पण वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात आता शहरात केवळ तीस तलाव राहिले आहेत. हे तलाव शहरांचं वैभव पण गेल्या काही वर्षात हेच वैभव मृत्यूचा सापळा बनत आहे. ठाण्यातल्या ब्रह्मांड परिसरातल्या तुर्भे तलावात अनेकांचे जीव गेलेत. या तलावात मुलं पोहण्यासाठी येतात आणि आपला जीव गमावतात, इथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही अशी खंत नागरिकांनी व्यक्त केलीय. 

ठाण्यातल्या तलावांची दूरवस्था झाली आहे. तलावांचा उपसा होत नसल्यामुळे तलावांमध्ये गाळ साचला आहे. अनेक तलावांची सुरक्षा भिंत ढासळलीय, ती परत बांधणं गरजेचं आहे. तलावांमध्ये पोहोण्यावर बंदी घालणं गरजेचं आहे. त्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्त आवश्यक आहे. मात्र या कोणत्याही गोष्टी होताना इथे दिसत नाही. त्यामुळे आता तरी महापालिकेने आवश्यक त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे.