आजपासून नवे नियम लागू, थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर
आजपासून अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होण्याची शक्यता आहे.
मुंबई : आजपासून अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होण्याची शक्यता आहे. विमान प्रवास, मिठाई, गॅस सिलिंंडर, आरोग्य विम्यासह अनेक गोष्टींमध्ये महत्वाचे बदल होणार आहेत. याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. त्यामुळे याची माहिती असणे आवश्यक आहे.
वाहन परवाना, आरोग्य विमा
आजपासून वाहन परवाना आणि गाडीच्या रजिस्ट्रेशनची ओरिजिनल कॉपी सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विम्यात समाविष्ट होणाऱ्या आजारांचीही संख्या वाढवण्यात आली आहे. मात्र यामुळे आरोग्य विम्याचा हप्ता महागेल. आरोग्य विम्या अंतर्गत तुम्हाला जास्त सुविधा मिळतील. १ ऑक्टोबरपासून आरोग्य विमाचे नियम पूर्णतः बदलणार आहेत. आता एकदा पॉलिसी विकल्यानंतर ग्राहकाने क्लेम केल्यानंतर कंपनी मनमानी पद्धतीने तो क्लेम रद्द करू शकत नाही.
तसेच विमासाठीचा वेटींग पिरियडही कमी होणार आहे. जर तुम्ही सलग ८ वर्ष पॉलिसी प्रिमीयम भरला असेल तर कोणतीही कंपनी कुठलंही कारण देऊन क्लेम रद्दबातल करू शकत नाही. तसेच अधिकाधिक आजारांचा समावेश पॉलिसीत करता येणार आहे. मात्र याचा परिणाम प्रीमियमच्या दरात दिसून येईल. प्रीमियमचे दर वाढू शकतात.
मिठाईवर एक्स्पायरी डेट अनिवार्य
टिव्ही सेट्सची किंमत ५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. आजपासून मिठाईवर एक्स्पायरी डेट लिहीणे अनिवार्य असेल. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) एक आदेश जारी करून मिठाईच्या दुकानांना दुकानात उपलब्ध असलेल्या सर्व मिठाईची मुदत संपण्याची तारीख किंवा 'आधीची बेस्ट तारीख' जाहीर करणे अनिवार्य केले आहे. आता, मिठाईच्या दुकानात सर्व मिठाईसमोर 'तारखेपूर्वीचे सर्वोत्कृष्ट' असं नमूद करणे आवश्यक असेल.
टोल दरात वाढ
मुंबईत आजपासून टोलचे दर वाढत आहेत. आधीच महागाई आणि कोरोनामुळे कंबरडं मोडलेल्या सर्वसामान्यांना वाढलेल्या टोल दरांचा सामना करावा लागणार आहे. आजपासून टोलच्या दरात ५ ते २५ रूपयांची वाढ होणार आहे. मासिक पासाचे दरही वाढतील. त्यामुळे महागाईत अधिकच भर पडेल. एकीकडे रोज वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना सर्वसामान्य मुंबईकरांना आता मुंबईत प्रवेश करण्यासाठी वाढीव दराने टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी संताप व्यक्त केला आहे.