मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे, पण अजूनही धोका कायम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकजण पर्यटनला मुकले होते. आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच, अनेक जण नियमांचं उल्लंघन करत पर्यटनाला बाहेर पडतात. पण लॉकडाऊनमध्ये समुद्रकिनारी पर्यटन करणं दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना वसईत घडली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारच्या निमित्ताने समुद्रकिनारी मौज मजा करण्यासाठी नालासोपारा इथं राहणारं एक कुटुंब वसईच्या सुरुची समुद्र किनाऱ्यावर आले होते. त्यातील काही तरुण दुपारनंतर पोहण्याचा आनंद घेण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले. यावेळी समुद्र खवळलेला असल्यानं यातील दोन तरुण पाण्याच्या लाटांसोबत समुद्रात खेचले गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोन तरुण बुडाले. अजित विश्वकर्मा (१३) आणि रणजित विश्वकर्मा (२०) अशी दोघांची नावे असून दोघेही चुलत भाऊ असल्याची माहिती समोर येत आहे. 


स्थानिकांना घटनेची माहिती मिळताच शोधकार्य सुरु करण्यात आलं. पण संध्याकाळच्या सुमारास दोन्ही तरुणांचे मृतदेह समुद्रकिनाऱ्याला लागले. वसई पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे. वसई पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मित नोंद करण्यात आली आहे.