मुंबई: निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास अनेक नेत्यांनी विरोध केला. साताऱ्यातून रामराजे निंबाळकर किंवा दुसरा उमेदवार द्यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे उदयनराजेंनी आपण साताऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले. मात्र, पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल असेही उदयनराजे यांनी सांगितले. परंतु, शरद पवारांचे जसे सर्वपक्षीय मित्र आहेत तसे आपलेही सर्व पक्षात मित्र आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला. 


मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या लोकसभा आढावा बैठकीला खासदार उदयनराजे काहीसे उशीरा पोहोचले. उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या मुख्यालयात पहिल्यांदाच आले. त्यामुळे हे मुख्यालय शोधण्यात त्यांचा बराच वेळ गेला. परिणामी ते बैठकीला वेळेवर पोहोचू शकले नाहीत. उदयनराजेंनी मात्र वाहतूक कोंडीमुळे आपल्याला उशीर झाल्याचे सांगितले. 


दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर शरद पवार उदयनराजेंना पुन्हा उमेदवारी देणार का, उमेदवारी न दिल्यास उदयनराजे दुसऱ्या पक्षात जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.