उद्धव आणि आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

सांगली आणि कोल्हापुरातल्या २२३ गावांना महापुराचा फटका बसला आहे.

Updated: Aug 9, 2019, 09:51 AM IST
उद्धव आणि आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार  title=

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे लवकरच कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याचे समजते. गेल्या चार दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक भागांना पाण्याचा वेढा पडला आहे. घरे पाण्याखाली गेल्याने अनेक लोक रस्त्यावर आले आहेत. 

मात्र, अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यग्र असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे शिवसेनेवर जोरदार टीकाही झाली होती. गेल्या चार दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात कोणतेही भाष्य केले नव्हते. अखेर साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेखर गोरेंनी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना पुराची आठवण झाली होती. 

त्यामुळे मतांसाठी जनआशीर्वाद यात्रा काढणारे शिवसेना नेते आदित्य ठाकरे आता पूरग्रस्त संकटात असताना कुठे गेले आहेत? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता. 

कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराच्या परिस्थितीमुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपले कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतला होता. 

सांगली आणि कोल्हापुरातल्या २२३ गावांना महापुराचा फटका बसला आहे. आतापर्यंत पुराचे २७ बळी गेले आहेत. कोल्हापूर शहरात हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. ७० हजार जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. महापुरामुळे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ६७ हजार हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.