उर्दू ही मुसलमानांची भाषा? महाराष्ट्रानं या भाषेला... शिवरायांचा उल्लेख करत काय म्हणाले जावेद अख्तर?

Javed Akhtar On Urdu : अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आणि उर्दू भाषेसोबत महाराष्ट्राचा उल्लेख करत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी वेधलं लक्ष...   

सायली पाटील | Updated: Oct 7, 2025, 10:06 AM IST
उर्दू ही मुसलमानांची भाषा? महाराष्ट्रानं या भाषेला... शिवरायांचा उल्लेख करत काय म्हणाले जावेद अख्तर?
veteran lyricyst javed akhatr Bahar e Urdu on urdu literature and its relation with maharashtra latest update

Javed Akhtar On Urdu : सहसा काही भाषा या थेट धर्माशी जोडल्या जाता. उर्दू, ही त्यातलीच एक. उर्दू ही मुसलमानांची भाषा... सहसा असाच अनेकांचा दृष्टीकोन आहे? असा प्रश्नार्थक सूर आळवला असता, ही कोणत्या मुसलमानांची भाषा आहे? असा प्रतिप्रश्न ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी मुंबईत आयोजित एका मुलाखतपर कार्यक्रमात उपस्थित केला. 

Add Zee News as a Preferred Source

आपल्याच प्रश्नाला पुढे नेत, ते म्हणाले, 'कोणते मुसलमान, केरळचे? तामिळनाडूचे? केरळचे बशीर नावाचे लेखक उर्दूत लिहायचे? बंगाली शायर नजरुल इस्लाम उर्दूत लिहायचे? भाषा या कोणत्या धर्माच्या नसतात. जर त्या धर्माच्या असत्या, तर सर्व धर्माची लोकं एकच भाषा बोलत असते. युरोपात सारे ख्रिस्तधर्मीय आहेत, तर ते एकच भाषा बोलत असते. हिंदुस्तानात 85 टक्के लोकसंख्या हिंदूंची आहे तर ते सारे एकच भाषा बोलत असते. भाषा कधीच धर्माच्या नसतात. तर त्या प्रांताच्या असतात. सहसा विचार करण्याचे अनेक दृष्टीकोन असतात. मुळात उर्दूची लिपी ही पर्शियन आहे. इथं लिपी महत्त्वाचा मुद्दाच नाही.'

अख्तर यांनी हल्लीच्या अभिनय क्षेत्रातील कलाकारांचा उल्लेख करत त्यांना ना हिंदी येते ना उर्दू. त्यांना तर रोमन (इंग्रजीत) लिपीत डायलॉग लिहून दिले जातात, अशी कोपरखळी मारली. मुळात इंग्रजीच मूळ लिपी नाही, ती रोमन आणि लॅटिन लिपीतून आलिये, मग इंग्रजी लॅटिन आहे का? असा प्रतिप्रश्नही केला. 

महाराष्ट्रानं उर्दू जिवंत ठेवली, मात्र...

'महाराष्ट्रानं उर्दू जिवंत ठेवली, मात्र दिल्ली आणि इतर राज्यांना ते जमलं नाही', असं वक्तव्य ज्येष्ठ गीतकार, पटकथाकार जावेद अख्तर यांनी केलं. जगभरात भारतातील उर्दू बोलली जाते असंही ते म्हणाले. मुंबईत महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 'बहार ए उर्दू' कार्यक्रमात ते बोलत होते. 'महाराष्ट्र, हे नाव नंतर आलं मात्र हा जो प्रांत आहे तिथं एकेकाळी पर्शियन भाषेला इतका मान होता, जो आजच्या काळात इंग्रजीला आहे. दिल्ली, लखनऊ अशा उर्दूच्या जन्मस्थळीसुद्धा या भाषेला इतकं जपण्यात आलेलं नाही जितकं महाराष्ट्राला जपण्यात आलं आहे', असं म्हणत महाराष्ट्रातील उर्दूविषयी अख्तर म्हणाले, 'महाराष्ट्र एक अशी जागा आहे, ज्याचा इतिहास सांगतो की या राज्याचं मन मोठं आहे.'

मुघल आणि उर्दू....

'मुघलांची मातृभाषा पर्शियन नव्हती. मात्र ती त्यावेळची इंग्रजी होती. आपल्या इथं मराठवाड्यात जे पेशवा होते त्यांचीही भाषा पर्शियन होती. शिवाजी महाराज हे पहिले राजे होते ज्यांनी पर्शियन आणि मराठी भाषेलाही राजाश्रय दिला होता' अशी ऐतिहासिक उदाहरणं त्यांनी दिली. महाराष्ट्राचं उर्दू भाषेवर मोठं ऋण आहे, असं सांगताना त्यांनी काही उदाहरणं दिली.  '20 व्या शतकापासून उर्दू भाषेवर महाराष्ट्राचं ऋण आहे. स्वातंत्र्यानंतर उर्दूतील सर्व मोठे लेखक मुंबईत आले. साहिर, राजीवसिंग बेदी, मजरुह सुल्तानपुरी, इस्मत चुक्ताई, मोजू तितके कमी. हे सर्व आघाडीचे लेखक मुंबईत आले. या शहरानं त्यांना आसरा आणि उदरनिर्वाहाचं साधन दिलं. मुंबईत त्याना कलाविश्वाची साथ मिळाली. एक मोठा काळ आहे जिथं 90 टक्के संवाद लेखक आणि गीतकार हे उर्दूतील होते जे हिंदी चित्रपटांसाठी लिहित होते. या एकाच ठिकाणहून निघालेल्या दोन नद्या आहेत..', इतक्या सुरेख उदाहरणांसह त्यांनी या भाषेचं आणि महाराष्ट्राचं नातं सर्वांपुढे ठेवलं.  

FAQ

जावेद अख्तरांनी उर्दूला मुसलमानांची भाषा म्हणण्याबाबत काय म्हटलं?
अख्तर म्हणाले, उर्दू ही कोणत्या मुसलमानांची भाषा? केरळचे, तामिळनाडूचे? केरळचे लेखक बशीर किंवा बंगाली शायर नजरुल इस्लाम उर्दूत लिहित होते का? भाषा कधीच धर्माची नसते, तर प्रांताची असते. 

महाराष्ट्राने उर्दूला कसं जिवंत ठेवलं?
महाराष्ट्राने उर्दूला जपलं, जसं दिल्ली किंवा लखनऊमध्ये झालं नाही. मुंबईतील 'बहार ए उर्दू' कार्यक्रमात अख्तर म्हणाले, हा प्रांत (पूर्वीचा) पर्शियनला इंग्रजीसारखा मान देत असे. महाराष्ट्राचं मन मोठं आहे, ज्याने उर्दूला आसरा दिला. 

ऐतिहासिकदृष्ट्या मुघल, पेशवे आणि उर्दूचं नातं काय?
मुघलांची मातृभाषा पर्शियन नव्हती, पण ती त्या काळची इंग्रजी होती. मराठवाड्यातील पेशव्यांची भाषा पर्शियन होती. शिवाजी महाराज हे पहिले राजे होते ज्यांनी पर्शियन आणि मराठी दोन्हीला राजाश्रय दिला. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More