मुंबई : आज उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. डोंबिवलीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेल्या पाटणकरांची मुलगी मातोश्रीचं माप ओलांडून ठाकरे झाली. तेव्हापासूनच तुमच्या सुखदुःखात पाठिशी राहीन आणि सदैव भक्कम साथ देईन, ही उद्धव ठाकरेंना दिलेली शपथ रश्मी ठाकरेंनी अत्यंत सुंदरपणे निभावली आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं ही तमाम शिवसैनिकांची इच्छा होतीच, पण कित्येक वर्षांपासूनचं हे रश्मी ठाकरे यांचं स्वप्न होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिर्सेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या पत्नीची भूमिका निभावताना त्यांनी ठाकरेंची संस्कारी आणि मातोश्रीच्या परंपरा जपणारी सून, शिवसैनिकांच्या वहिनीसाहेब, आदित्य ठाकरेंना प्रोत्साहन देणारी आई अशा भूमिकाही चोख निभावत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सगळ्यात जवळचा समर्थक, राजकीय सल्लागार आणि सर्वात मोठं बलस्थान म्हणजे रश्मी ठाकरे. 


सार्वजनिक कार्यक्रमात उद्धव ठाकरेंची पत्नी म्हणून त्यांची उपस्थिती असते. पण पडद्यामागे त्या शिवसेनेच्या अत्यंत सक्रिय अशा कार्यकर्त्या आहेत. मातोश्रीवर आलेल्या पाहुण्याचं स्वागत अतिशय आपुलकीने त्या करतात. माँसाहेबांसारख्याच त्या उत्तम सुगरण आहेत. शिवसैनिकांशी विशेषतः शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांशी सातत्यानं संवाद आणि उत्तम सामाजिक आणि राजकीय नेटवर्क असल्यानं राजकीय, सामाजिक अंडरकरंटस रश्मी वहिनींपर्यंत कायम पोहोचत असतात.


रश्मी ठाकरेंचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यापर्यंत आलेल्या प्रत्येक तक्रारीची, माहितीची त्या शहानिशा करतात. विशेष म्हणजे रश्मी ठाकरेंचा जेवढा तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संपर्क असतो तेवढाच त्यांचा मुंबईतल्या उच्चभ्रूंच्या पेज थ्री सर्कलमध्येही वावर असतो. त्यामुळे सगळ्या स्तरातल्या खबरी रश्मी वहिनींपर्यंत अचूक पोहोचतात. 


मुळात रश्मी ठाकरेंचा राजकीय सेन्स अत्यंत चांगला आहे. उद्धव ठाकरेंकडेच शिवसेनेची कमान देण्यासाठी बाळासाहेबांना राजी करण्यात रश्मी ठाकरेंची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती, असं म्हणतात. त्यानंतर राज ठाकरे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे अत्यंत अस्वस्थ होते, त्यावेळी त्यांना भक्कम आधार देण्यात रश्मी ठाकरेंची महत्त्वाची भूमिका होती. उद्धव ठाकरेंच्या राजकीय कारकीर्दीत विशेषतः बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना सांभाळण्यात उद्धव ठाकरेंना भक्कम साथ देणाऱ्या शिवसैनिक म्हणजे रश्मी ठाकरे.


१९८७ साली रश्मी ठाकरे या एलआयसीमध्ये नोकरीला लागल्या. या दरम्यान त्यांची भेट जयवंती ठाकरे यांच्यासोबत झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जयवंती या बहिण आहेत. पुढे जयवंती यांनीच रश्मी यांची उद्धव ठाकरेंसोबत भेट करुन दिली. त्यावेळी फारसे राजकारणात सक्रीय नसलेले उद्धव ठाकरे फोटोग्राफी करायचे. पुढे या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर १३ डिसेंबर १९८९ रोजी त्यांचा विवाह झाला.