Mumbai Local Train Update: मुंबई लोकलचा विस्तार करण्यात येत आहे. लोकलमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे. ऑफिसबरोबरच विविध कारणांनी मुंबईत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशावेळी लोकलचा प्रवासच अधिक सोयीचा आहे. मात्र लोकलमधील वाढत्या गर्दीमुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र, याच वाढत्या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी लोकलचा विस्तार करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवर लवकरच नवीन मार्गिका उभारण्यात येत आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) माध्यमातून सुरू असलेल्या विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम ३५ टक्के पूर्ण झाले आहे. ते २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे एमआरव्हीसीचे लक्ष्य आहे. या नव्या मार्गिकेमुळे लोकल रेल्वेच्या २००हून अधिक फेऱ्या वाढतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-३ अंतर्गत सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी ३ कोटी ५७८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा ६४ किमीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात नवी तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्यात येत आहे. पश्चिम रेलवेच्या विरार आणि डहाणू रोड दरम्यानच्या सध्याच्या दुहेरी मार्गावर उपनगरीय, मालवाहतूक आणि एक्स्प्रेस गाड्यांचा भार अधिक आहे. त्याचा परिणाम रेल्वेच्या कार्यक्षमतेवर होतो. शिवाय, या भागातील रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ करण्यातही अडचणी येत होत्या.
या नव्या मार्गिकांमुळं हे. विरार ते डहाणू आणि चर्चगेट ते डहाणूदरम्यान सेवांची वाढ करण्यास मदत होणार आहे. सध्या चर्चगेट ते डहाणूदरम्यान दिवसभरात 6 ते 7 थेट गाड्या धावतात. चौपदरीकरणामुळे विरार-डहाणू दरम्यानच्या सेवा, तसेच संपूर्ण मार्गावर 200 पेक्षा अधिक सेवा चालवल्या जाऊ शकतात. सध्या विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, डहाणू रोड आणि उमरोली स्थानकांसह पुलांवर स्टेशन इमारतींचे बांधकाम सुरू आहे.
विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्प उपनगरीय आणि मुख्य रेल्वे नेटवर्कवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर रेल्वेच्या सेवा वाढणार असून त्यामुळं गर्दीदेखील कमी होणार आहे. सध्या या मार्गासाठी 29.17 हेक्टर खासगी आणि 10.26 हेक्टर सरकारी, 29.17 हेक्टर वनजमीनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे.
विरार-डहाणू रोड मार्गिकेवर एकूण 16 मोठे पूल बांधण्यात येणार असून त्यातील 4 पुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर, 40 लहान पुलांचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवरील 4 अंडर पूल आणि 1 रेल्वे ओव्हर पूल असणार आहेत.