Savarkar Issue: सावरकरांच्या मुद्द्यावर विरोधीपक्षांच्या बैठकीत काय म्हणाले Sharad Pawar? वाचा पवारांनी मांडलेले 3 मुद्दे

Sharad Pawar On Rahul Gandhi Comment About Veer Savarkar: विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधींनी केलेल्या विधानावरुन आपली भूमिका स्पष्ट करताना सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसला सूचक शब्दांमध्ये सल्ला दिला.

Updated: Mar 28, 2023, 06:15 PM IST
Savarkar Issue: सावरकरांच्या मुद्द्यावर विरोधीपक्षांच्या बैठकीत काय म्हणाले Sharad Pawar? वाचा पवारांनी मांडलेले 3 मुद्दे title=
,Sharad Pawar Rahul Gandhi

Sharad Pawar On Rahul Gandhi Comment About Veer Savarkar: मित्रपक्षांच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कठोर भूमिका मांडली आहे. शरद पवारांनी विरोधकांच्या बैठकीत सावरकरांबाबत मांडलेल्या भूमिकेबाबत झी २४ तासला माहिती दिली. या बैठकीमध्ये पवार यांनी नेमकं काय सांगितलं? ते विरोधी पक्षांना सावरकरांबद्दल काय म्हणाले? त्यांनी जे मुद्दे बैठकीत मांडलेले मुद्दे जसेच्या तसे २४ तासला मिळाले आहेत. विरोधकांच्या बैठकीत पवारांनी नेमके कोणते मुद्दे मांडले ते पाहूयात...

1) सर्व सहमतीच्या समान मुद्द्यांवर एकत्र येवून लोकशाहीवरचा हल्ला परतवण्याची गरज. सावरकरांचा विषय आता नको.

2) सावरकरांबाबत मतभेद असू शकतात. मात्र सावरकरांच्या त्यागाविषयी दुर्लक्ष करुन चालणार नाही.

3) सावरकर पुरोगामी विचारांचे होते. गायीबाबत त्यांचे विचार प्रागतिक विज्ञानवादी होते. त्यांच्या समग्र वाड्मयातील पाचव्या खंडात त्यांनी मांडलेले आहेत.

मुद्दा उकरायला नको

शरद पवारांनी या बैठकीमध्ये मांडलेल्या मुद्द्यासंदर्भात यापूर्वीच सुत्रांच्या हवाल्याने माहिती समोर आली होती. वीर सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नाही असं पवारांनी या बैठकीमध्ये सावरकरांवर टीका करणाऱ्यांना सुनावल्याचं समजतं. सावरकरांचा मुद्दा सोडून इतर मुद्दे हाती घ्यावे असा सल्ला काँग्रेसला दिला. सावरकर आणि आरएसएसचा संबंध नसल्याचंही पवारांनी या बैठकीत सांगितल्याचं समजतं. सावरकरांच्या मुद्द्यावरून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवर ठाकरे गटानं यापूर्वीच बहिष्कार टाकत असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच उद्धव ठाकरेंनी मालेगाव येथे झालेल्या सभेत सावरकारंचा अपमान खपवून घेणार नसल्याचा अप्रत्य इशाराही दिला होता. त्यानंतर आता शरद पवारांनीही सावरकारांचा मुद्दा काँग्रेसनं उकरून काढू नये असा सल्ला दिला आहे.

भाजपाकडून आव्हान

दरम्यान, शरद पवारांनी सावरकरांबद्दल घेतलेल्या या भूमिकेवरुन भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी पवरांना टोला लगावला. शरद पवारांनी सावरकर गौरव यात्रा काढावी, असा सल्ला शेलार यांनी दिला आहे. तसेच शरद पवारांनी सावरकरांना बोलघेवडेपणा करू नये, सावरकर सन्मान कार्यक्रम त्यांनी हाती घ्यावा असं आव्हान आशिष शेलारांनी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली.

हे प्रकरण काय?

सुरतमधील न्यायालयाने राहुल गांधींना 'मोदी अडनाव' प्रकरणावरुन दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधींचं लोकसभेच सदस्यत्व रद्द करण्यात आलं. यानंतर शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये राहुल गांधींनी मी केलेल्या विधानाबद्दल माफी मागणार नाही. मी सावरकर नाही गांधी आहे, अशा अर्थाचं विधान केलं होतं. या विधानावरुन बराच राजकीय वाद झाल्यानंतर आता काँग्रेसचे जुने सहकारी असलेल्या शरद पवारांनीच काँग्रेसला आता हा विषय हाती घेण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे.