)
ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्त आहे. विधानसभा निवडणुकीपासून विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही. तर पावसाळी अधिवेशनात परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिकामी झालीये. विधान परिषदेवर आता काँग्रेसनं दावा केलाय. त्यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केलीये.
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची विरोधी पक्षनेतेपद रिक्त असण्याची बहुदा पहिलीच वेळ असावी... महायुतीचं सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सत्तेत आल्यापासून विधानसभेत विरोधी पक्षनेते नाहीयेत. पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपला... तेव्हापासून दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेत्यांची निवड झालेली नाही. विरोधी पक्षनेतेपद हे संविधानिक पद असताना दोन्ही पदं अजून रिक्त कशी अशी चर्चा सुरु आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे भास्कर जाधव हे आग्रही होते. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशनात अर्ज विनंत्या केल्या. पण विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता निवडीचा विषय अजून मनावर घेतला नाही. आता काँग्रेसनंही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी धावपळ सुरु केलीय. काँग्रेस नेते सतेज पाटलांना हे पद मिळावं यासाठी ते आग्रही आहेत. मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंशी या संदर्भात चर्चा केली.
सध्या विधानसभेत विरोधकांकडं सर्वात जास्त आमदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडं आहेत. तर विधान परिषदेत विरोधकांपैकी सर्वात जास्त 8 आमदार काँग्रेसकडं आहेत. त्यामुळं यावेळी वरिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडं असावं असं काँग्रेसला वाटतंय. पण हे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना वाटूनही काही होणार नाहीये. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हेच विरोधी पक्षनेतेपदाची निवड करणार आहेत. त्यामुळं राम शिंदे आणि राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर विरोधी पक्षनेतेपदी कोण बसणार हे स्पष्ट होणार आहे.