)
तरुणाईत दडलेलं सूत्रसंचालनाचं कौशल्य उलगडून दाखवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांची कला मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी झी 24 तास या वृत्तवाहिनीने ‘हूज गॉट द माईक’ ही आगळीवेगळी टॅलेंट हंट स्पर्धा आयोजित केली.
या उपक्रमाचा भाग म्हणून झी 24 तासची टीम राज्यातील 9 महाविद्यालयांमध्ये पोहोचली. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आपल्या संवादकौशल्य, आत्मविश्वास, स्टेज प्रेझेन्स आणि सूत्रसंचालनाची शैली दाखवून दिली. महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना मिळालेल्या या संधीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांना एक नवीन मंच लाभला.
या फेऱ्यांमधून परीक्षकांनी 10 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली गेली. त्यानंर हे स्पर्धक झी 24 तासच्या कार्यालयात झालेल्या अंतिम ऑडिशनसाठी एकत्र आले. त्यातून केवळ तीन सर्वोत्तम अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली.
1. किर्ती महाविद्यालय
असं म्हणतात की किर्ती कॉलेजचा वडापाव जितका प्रसिद्ध आहे तितकंच इथलं टॅलेंटही गाजतं. इथून तब्बल २८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यातून टॉप ५ विद्यार्थ्यांची निवड झाली. विद्यार्थी अतिशय बोलके, उत्साही आणि आत्मविश्वासू होते. कॉलेज मॅनेजमेंटनेही उत्तम सहकार्य केलं. निवडलेल्या विद्यार्थ्यांना ‘जॉय गिफ्ट हॅम्पर्स’ देऊन सन्मानित करण्यात आलं.
2.रुपारेल महाविद्यालय
या कॉलेजमधून तब्बल 65 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. आपली पाळी येईपर्यंत त्यांनी संयमाने वाट पाहिली. कुणाला लेखनाची आवड, कुणी कविता सादर केली, कुणाकडे अॅक्टिंगचं कौशल्य होतं. इतक्या टॅलेंटमधून फक्त टॉप 6 विद्यार्थ्यांची निवड करणं खूप कठीण होतं. शेवटी निवडलेल्या विद्यार्थ्यांना ‘जॉय गिफ्ट हॅम्पर्स’ देण्यात आले.
3. पिल्लई महाविद्यालय
इथं विद्यार्थ्यांचा विविधतेने भरलेला सहभाग दिसून आला. महाराष्ट्रातील विविध भागांहून आलेले विद्यार्थी, वेगवेगळ्या शैक्षणिक शाखांमधून आलेले, पण आत्मविश्वास मात्र एकसारखाच. काही विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच मंचावर उभं राहताना जबरदस्त आत्मविश्वास दाखवला. यामधून टॉप 6 विद्यार्थ्यांची निवड झाली आणि त्यांना ‘जॉय गिफ्ट हॅम्पर्स’ देऊन गौरवण्यात आलं.
4. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT)
या ठिकाणी देशभरातून — दिल्ली, कोलकाता, मध्य प्रदेश, हरिद्वार अशा विविध भागांतून विद्यार्थी आले होते. फॅशनच्या अभ्यासाबरोबरच त्यांची स्टाईल, आत्मविश्वास आणि प्रस्तुती भन्नाट होती. तब्बल 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यातून टॉप ५ विद्यार्थ्यांची निवड झाली. विद्यार्थ्यांची फॅशन सेन्स पाहून परीक्षक प्रभावित झाले. निवडलेल्या विद्यार्थ्यांना ‘जॉय गिफ्ट हॅम्पर्स’ भेट देण्यात आले.
5. रुईया महाविद्यालय
मुंबईतल्या माटुंगा स्थित रुईया महाविद्यालयात अँकर शोधण्याचा पहिला कार्यक्रम संपन्न झाला. रुईयामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह मस्त होता. जवळपास 45 विद्यार्थी सहभागी होते. विद्यार्थी काही नवं करण्याच्या उद्देशाने आणि स्वत:मधली कला दाखवण्यासाठी उत्सुक होते. रुईयाचा नाट्यवलय विभाग हा जास्त सक्रीय असल्याने नाट्य विभागातील विद्यार्थ्यांचा सहभाग जास्त होता. रुईया महाविदयालयात 6 जणांना निवडण्यात आलं.
6. जोशी-बेडेकर महाविद्यालय
दुसरं महाविद्यालय म्हणजे ठाण्यातील प्रसिद्ध महाविद्यालय जोशी-बेडेकर. जोशी बेडेकरच्या अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी नाटक-चित्रपट, टिव्ही या माध्यमांमधून यश मिळवलंय. अर्थातच, विद्यार्थीची निवड करणं तितकसं सोपं काम नक्कीच नव्हतं. सुमारे 45 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
7. ज्ञानसाधना महाविद्यालय
ठाण्यातील दुसरं महाविद्यालय म्हणजे सतीन प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ज्यामध्ये झी 24तासने Joy Presents Who’s Got The Mic ही स्पर्धा घेतली. मुलांचा उत्साह प्रचंड होता जवळपास ६५ मुलांनी आपली नोंद केली. पण निवड करण्याचं बंधन साहजिकच आम्हाला होतं त्यामुळे फक्त 5 विद्यार्थी आम्ही निवडले. मीत पाटील, राज पांडे, सोनाली लोंढे, साक्षी आणि कार्तिक. विशेष म्हणजे मुलं साधारण 11 वी, 12 वीत होती. त्यांना आपल्या सभोवताली असलेल्या जगाशी संवाद साधण्याची वृत्ती वारंवार त्यांच्यामध्ये दिसत होती.
8. ठाकूर महाविद्यालय
26 सप्टेंबरला आम्ही भेट दिली ती मुंबईतील कांदिवली स्थित ठाकूर कॉलेजला ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स. जवळपास 60 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्सफूर्त असा प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे हिंदी भाषिकांची उपस्थिती वाखाणण्यासारखी होती. अवंतिका, मृणाल, कथा, वैभवी, शिवाजी अशा पाच विद्यार्थींनी बाजी मारली.
9. SNDT महाविद्यालय
चर्चगेटमधील SNDT चं कला महाविद्यालय परिक्षेमुळे मुलींची संख्या तुलनेने कमी असली तरी उत्साह तसूभरही कमी नव्हता. अगदी तो शिगेला पोहचल्याचं एक उदाहरण म्हणजे ऑडिशन देण्यासाठी एक विद्यार्थ्यीनी तर चक्क परिक्षेचा पेपर अर्धा तासात भराभर सोडवून आली. कार्तिकी आणि लावण्या ह्या दोघींनी स्पर्धेत यश मिळवलं.
यासर्व महाविद्यालयांच्या भेटी दरम्यान आलेले व्यक्तीगत अनुभव म्हणजे शिक्षकांचं विद्यार्थ्यांसोबत असलेलं नातं. प्रत्येक महाविद्यालायाच्या शिक्षकांना आपला विद्यार्थी हा उत्तम नागरिक असावा हे वाटणारी आत्मीयता...त्यासाठी विविध अभ्यासेतर कला, स्पर्धांमध्ये अग्रेसर होण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्याची वृत्ती प्रकर्षानं जाणवली. अजून विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल ही धडपडही दिसली. यास्पर्धेतकरीता सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांचं, उपप्राचार्याचं त्याचबरोबर त्यांचे सहकारी असलेल्या सर्व प्राध्यापकांचं उत्तम असं सहकार्य लाभलं...जे अतिशय मनाला आनंद आणि समाधान देणारं होतं. एखादा उत्सव साजरा करावा तशी ही स्पर्धा अर्थातच विद्यार्थ्यांच्या सहकार्याशिवाय संपन्न होऊ शकली नसती..त्याच्या सहकार्याने ती अगदी यशस्वीही झाली.
उपक्रमामागचा हेतू
या संपूर्ण उपक्रमामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण दाखविण्यासाठी सुवर्णसंधी देणे. केवळ महाविद्यालयीन कार्यक्रमांपुरतं न राहता मोठ्या व्यासपीठावर त्यांचं कौशल्य झळकावं, आत्मविश्वास वाढावा आणि भविष्यातील अँकरिंग स्टार्स घडावेत हेच या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे.
सुवर्णसंधी
विजेता – प्रतिष्ठित झी 24 तास सन्मान पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन एका सेलिब्रिटी सूत्रसंचालकासोबत करण्याची सुवर्णसंधी.
रनर-अप्स – झगमगत्या रेड कार्पेटवर उभं राहून नामांकित कलाकारांसोबत खास वन-ऑन-वन मुलाखती घेण्याची संधी.
तिसरा क्रमांक – विशेष गौरव आणि झी 24 ताससोबत आपलं सूत्रसंचालन कौशल्य दाखवण्याची संधी.
खास गिफ्ट हॅम्पर्स
प्रत्येक महाविद्यालयातील टॉप 5 किंवा टॉप 6 विद्यार्थ्यांना ‘जॉय’कडून गिफ्ट हॅम्पर्स देऊन गौरवण्यात आलं. यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक दुणावला आणि सहभागींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
या सर्व ऑडिशन्सना झी 24 तासच्या एडिटोरियल टीममधील कावेरी विक्रांत पिंपळे आणि प्रशांत सोनार यांनी परीक्षक म्हणून न्याय दिला.