नागपुर स्फोटातील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 82 लाखांची तर जखमींना 25 लाखांची मदत जाहीर

एक्सप्लोसिव्ह दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला प्रत्येकी 82 लखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. नागपुरातील SBL या स्फोटकं तयार करणा-या कंपनीतील भीषण स्फोटप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी रात्रीतून 9 जणांना अटक केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Mar 2, 2026, 08:45 PM IST
 नागपुर स्फोटातील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 82 लाखांची तर जखमींना 25 लाखांची मदत जाहीर

Nagpur Blast :   नागपुरातील SBL या स्फोटकं तयार करणा-या कंपनीतील भीषण स्फोटप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एसबीएल एनर्जी कंपनीचे संचालक, प्रोजेक्ट मॅनेजर, प्लांट मॅनेजर, सुपरवायझर, सेफ्टी ऑफिसरसह 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी रात्रीतून 9 जणांना अटक केली असून पोलिसांनी इतर आरोपींचा शोध सुरु आहे.  नागपुरातील SBL कंपनीती भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात 19 कामगारांचा मृत्यू झाला होता. तर काही कामगार जखमी झाले होते.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 1 मार्च रोजी सकाळी 6.30 च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली होती. नागपुर स्फोटातील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 82 लाखांची तर जखमींना 25 लाखांची मदत जाहीर झाली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

एक्सप्लोसिव्ह मॅन्युफक्चरर कंपनीने 75 लाखांची मदत

काटोल तालुक्यातील एक्सप्लोसिव्ह दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला भविष्यात सावरता यावे यासाठी शासकीय मदती व्यतिरिक्त एस.बी.एल. एक्सप्लोसिव्ह मॅन्युफक्चरर कंपनीने 75 लाखांची रुपये तर जखमी झालेल्या व्यक्तीला 25 लक्ष रुपये देण्याचे आज कंपनीच्या वतीने मान्य करण्यात आले. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  राज्य शासनाचे मृत व्यक्तीस 5 लाख रुपये, केंद्र शासनाचे 2 लाख असे मिळून सूमारे 82 लक्ष रुपये प्रत्येकी मृत व्यक्तीच्या वारसांच्या नावे बँकेमध्ये ठेव स्वरुपात जमा केले जातील. त्यांच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला व्याज स्वरुपात हे पैसे घेता येतील.  मृत व्यक्तीचा पाल्य कायदेशिर सज्ञान झाल्यानंतर त्याला ही रक्कम घेता येईल, असा बैठकीत चर्चा करुन निर्णय घेण्यात आला.

 कामगार विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याचे निर्देश

आजवर विविध एक्सप्लोसिव्ह कारखान्यांमध्ये गेलेले बळी हे अत्यंत दु:खद आहेत. शासन स्वस्थ बसणार नाही. जे दोषी आहेत त्यांच्याविरुध्द कोणत्याही परिस्थितीत कठोर कारवाई केली जाईल. या एक्सप्लोसिव्ह कंपनीला परवाना देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या पेसोचे संबंधित वरिष्ठ अधिकारी, कामगाराच्या हिताच्या दृष्टीने नियमांचे पालन होते किंवा नाही ही पडताळण्याची जबाबदारी असलेला औद्योगिक सुरक्षा विभाग आणि कामगारांच्या हक्कासाठी असलेल्या कामगार विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.

बैठकीत कामगारांच्या सुरक्षेबाबत चर्चा

या बैठकीत आढावा घेतांना सद्यस्थितीत असलेले कायदे, केंद्र आणि राज्य सरकार अंतर्गत असलेल्या कार्यालयांतील विसंगती, अनेक वर्षांपासून हाच कायदा अमलात असल्याने बदलत्या परिस्थितीनुसार यात अंतर्भूत कराव्या लागणाऱ्या इतर बाबींचा समावेश याकडे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष वेधले. कामगार कायद्याप्रमाणे कामगारांना सुरक्षिततेचे सर्व साहित्य व प्रशिक्षण दिलेले होते का ?एक्सप्लोसिव्ह कंपन्यांसाठी शासनाच्या सुरक्षा विषयक मानकांची त्या ठिकाणी उपलब्धता होती का ? याबाबत पेसो कार्यालयातर्फे केलेल्या पडताळणीमध्ये किती त्रुटींची पूर्तता कंपनीतर्फे करण्यात आली आदी प्रश्न या बैठकीत विविध मान्यवरांनी उपस्थित केले.

कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठित

या अपघाताच्या अनुषंगाने केंद्र शासनांतर्गत कार्यरत असलेला पेसो विभाग, औद्योगिक  सुरक्षा व आरोग्य विभाग, कामगार आयुक्तालय यांच्या कार्यपध्दतीला अधिक तत्पर व जबाबदार करण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्तीचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. यात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचा समावेश आहे. आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी या केंद्रशासनाशी समन्वय साधून सदर शिफारशी करतील. 

शासनाच्या इज ऑफ डुईंग धोरणाचा कोणी गैरवापर करत असल्यास कारवाई होणार?

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायद्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्यात दुरुस्ती करणे, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कंपन्यांना व कामगारांशी संबंधित असलेल्या विभाग प्रमुखांना अधिक जबाबदार करणे, शासनाच्या इज ऑफ डुईंग धोरणाचा कोणी गैरवापर करत असेल तर त्यांच्याविरुध्द तत्काळ कारवाई करणे, कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षितता आदीबाबत ही समिती अभ्यास करुन आपल्या शिफारशी शासनाला सादर करेल. यावर राज्य शासन केंद्र शासनाशी समन्वय साधून तत्काळ निर्णय घेईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 

औद्योगिक सुरक्षा मानकांप्रमाणे पुर्तता होईपर्यंत कामगारांचे पगार चालू ठेवण्याचे आदेश

या स्फोटाची चौकशी होईपर्यंत कंपनीला सिल ठोकण्यात आले आहे. सर्व बाबींचा निष्कर्ष निघेपर्यंत या कंपनीतील कामगार उपाशी राहू नयेत याची काळजी कंपनीने घेतली पाहिजे. सर्व प्रक्रिया पार पडेपर्यंत कंपनीतर्फे कामगारांना किमान वेतन देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. याचबरोबर कंपनीत काम करणाऱ्या सर्व कामगारांना औद्योगिक सुरक्षा मानकांप्रमाणे किमान तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले पाहिजे. राज्य शासनातर्फे कंपनीच्या पडताळणीमध्ये आढळलेल्या त्रुट्या कंपनीने दुरुस्त केल्यानंतर जिल्हाधिकारी स्वत: याची पडताळणी करुन नंतरच कंपनीला परवानगीबाबत विचार करतील, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे काल झालेल्या दूर्घटनेबाबत आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उच्चस्तरीय बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल,  खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार समीर मेघे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, माजी मंत्री अनिल देशमुख,  ‍जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये, महाराष्ट्र राज्य बारुद कामगार संघटनेचे स्वप्नील वानखेडे, एस.बी.एल. एक्सप्लोसिव्ह मॅन्युफक्चरर कंपनीचे प्रमुख, कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More