Nagpur School Holiday: नागपुरातील सर्व शाळांना शनिवारी 17 एप्रिल रोजी सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. जिल्हा प्राथमिक शाळा ते महाविद्यालयं बंद राहणार आहेत.

Nagpur School Holiday: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चढला असून, घामाच्या धारा लागत आहेत. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून, आता पावसाळा कधी येणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. उष्मघाताने काहींचे मृत्यू झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. अशा स्थितीत तेथील प्रशासनाने दुपारी घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे प्रशासन पूर्वकाळजी म्हणून काही महत्त्वाचे निर्णय घेत आहे. याच पार्श्वभूमीनवर नागूपरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
नागपुरात उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्राथमिक शाळा ते महाविद्यालयांना उद्या म्हणजेच शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. आदेशानुसार अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयं बंद राहणार आहेत. वाढत्या उन्हाचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपुरात पारा 43 च्या पार गेला आहे. पुढील काही दिवसात उष्णतेची तीव्रता अजून वाढणार असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. यामुळे प्रशासन नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी काळजी घेत आहे.
दुसरीकडे अकोल्यात शाळेच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी यासंदर्भात आदेश दिला आहे. त्यानुसार शाळा आता सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. नियमाचं पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान हा निर्णय फक्त नागपूरपुरता घेण्यात आला आहे. महाराष्ट्राती इतर शाळा त्यांच्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरु राहणार आहेत.
वर्ध्यातही 16 एप्रिलला शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. वर्धा जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाने तब्बल 4 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला. उन्हामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाचा परिणाम वाहतुकीवरही जाणवत असून दुपारच्या सत्रात वाहनांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे.