राज्यात येणार सरकारी नोकऱ्यांचा पूर! फडणवीस विधानसभेत म्हणाले, 'पुढील दोन वर्षांत...'

CM Devendra Fadnavis On Employment: महाराष्ट्रामधील रोजगार निर्मितीबद्दलची सविस्तर माहिती फडणवीस यांनी गुंतवणुकीचा संदर्भ देत भाषणातून दिली. त्यावेळी त्यांनी महाभरतीचाही उल्लेख केला. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 14, 2025, 02:29 PM IST
राज्यात येणार सरकारी नोकऱ्यांचा पूर! फडणवीस विधानसभेत म्हणाले, 'पुढील दोन वर्षांत...'
फडणवीस यांची विधानसभेत माहिती

CM Devendra Fadnavis On Employment: महाराष्ट्रातील फडणवीस सरकारला 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाल्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिवाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना सरकारी कामांचा पाढाच वाचून दाखवला. शेतकऱ्यांपासून ते तरुणांपर्यंत आणि राज्यातील गुंतवणुकीपासून ते लाडक्या बहि‍णींपर्यंत अनेक गोष्टींचा उल्लेख करत फडणवीसांनी वेगवेगळ्या विषयांची आकडेवारी मांडली. यावेळेस फडणवीसांनी सरकारी नोकऱ्यांचा उल्लेख करत महाभरतीची घोषणा केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

7 लाख रोजगार निर्मिती

फडणवीस यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प सुरु झाले असून त्या माध्यमातून किती रोजगार निर्मिती झाली याबद्दलची माहिती दिली. "देशातील इतर राज्याच्या तुलनेत राज्याने भांडवली गुंतवणूक जास्त केलेली आहे. कुठलीही तडजोड आपण केलेली नाही. महाराष्ट्र हा गुंतवणुकीत पुढे चालला आहे. दावोसमध्ये आपण पाहिले की 15 लाख कोटी रुपयांचे करार केले होते. त्यातील 5 लाख कोटी गुंतवणूक ही विदर्भातील होती. कोकणात 2 लाख कोटी गुंतवणूक होती. 2022 ते 25 चा विचार केला तर दावोस गुंतवणूक ही 17 लाख कोटींवर जाते. सामंजस्य करारापैकी अंमलबजावणी झाली त्याचे प्रमाण 75 टक्के आहे. पहिल्या 2 वर्षांतील 90 टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजेच करार अंमलबजावणी सुरु आहे. 13 लाख 75 हजार कोटींची गुंतवणूक आहे. 7 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. एफडीएमध्ये (थेट परदेशी गुंतवणुकीत) महाराष्ट्र नंबर वन आहे," असं फडणवीस म्हणाले.   

ईव्ही कॅपिटल, अंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड अन् 1 लाख 25 हजार नोकऱ्या

"स्टीलमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक आहे. या माध्यमातून एक लाख रोजगार निर्माण होईल. गोल गॅसिफिकेशनमध्ये देशातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे 70 हजार कोटींची गुंतवणूक विदर्भात आली आहे. ईव्ही कॅपिटल म्हणून मराठवाडा तयार होतोय. 50 हजार कोटींची व 30 हजार रोजगार एवढी मोठी गुंतवणूक येथे आली आहे. टोयोटा, स्कोडा अशा जगातील सर्वात मोठे ब्रँड मराठवाड्यात आले आहेत.  इतर क्षेत्रात ही चांगली गुंतवणूक येत आहे. नाशिक, कोकण असेल त्याचबरोबर पाण्यासोबत सातारा व कोल्हापूर येथे ही गुंतवणूक येत आहे.  मिहान हे देशातील आयटीमधील 'बिग सिक्स' आहेत ते सर्व मिहानमध्ये आहेत. प्रत्यक्ष 1 लाख 25 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे," असं फडणवीसांनी सांगितलं. 

नक्की वाचा >> महाराष्ट्र दिवाळखोरीच्या मार्गावर? 'लाडकी बहीण' बंद होणार? फडणवीस म्हणाले, 'निवडणूक झाली की...'

इतिहासातील सर्वात मोठी भरती

राज्यात सरकारी नोकरभरती मोठ्या प्रमाणात केली जाणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं. "महाराष्ट्रात महाभरती सुरु केली. या तीन वर्षांत 1 लाख 20 हजार सरासरी नोकरी दिल्या आहेत.  पुढील दोन वर्षांत तेवढ्याच नोकरी देणार आहोत. इतिहासातील सर्वात मोठी भरती असेल," असं फडणवीस म्हणाले. म्हणजेच पुढील दोन वर्षांमध्ये जवळपास सव्वा लाख लोकांना सरकारी नोकरीत सामावून घेणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. 

"महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. 2030, 2035 आणि 2047 असे तीन टप्पे केले आहेत. 2029-30 दरम्यान देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्र असेल," असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More