नागपूरच्या कारखान्यात स्फोट! 17 कामगारांचा होरपळून मृत्यू; CM फडणवीस हळहळले, गडकरींनी वाहिली श्रद्धांजली

Nagpur Accident 17 Killed Factory Blast: या दुर्देवी स्फोटाची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विजय वडेट्टीवार यांनीही घेतली आहे. या अपघातात भीषण स्फोट होऊन 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 18 कामगार जखमी झाले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 1, 2026, 12:51 PM IST
नागपूरच्या कारखान्यात स्फोट! 17 कामगारांचा होरपळून मृत्यू; CM फडणवीस हळहळले, गडकरींनी वाहिली श्रद्धांजली
17 कामगारांचा मृत्यू झाला आहे (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

Nagpur Accident 17 Killed Factory Blast: नागपूरमधील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीत भीषण स्फोट होऊन 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 18 कामगार जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कळमेश्वर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या राऊळगावमधील या कंपनीत मोठा स्फोट झाल्याच्या वृत्ताला ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याला दुजोरा दिला. एसबीएल एनर्जी लिमिटेडही एक प्रमुख औद्योगिक स्फोटके बनवणारी कंपनी आहे. ही कंपनी खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी स्फोटके, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादने तयार करते.

Add Zee News as a Preferred Source

स्फोटाचे नेमके कारण अस्पष्ट

डेटोनेटर असेंबली डिपार्टमेंटमध्ये आज सकाळी अकराच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटाचे नेमके कारण काय याचा तपास सुरु आहे. पेसो, एनडीआरएफ आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहचली असल्याची माहिती जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिली आहे. दरम्यान या दुर्देवी स्फोटाची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विजय वडेट्टीवार यांनीही घेतली आहे. 

सखोल चौकशी करण्याचे आदेश

"नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे," असं फडणवीसांनी म्हटलं आहे. "मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत," असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

गडकरी म्हणाले, घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी, "नागपूर जिल्ह्यातील काटोल मधील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी या दारुगोळा निर्मिती कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 17 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. मृत कामगारांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना," असं म्हटलं आहे. 

सुरक्षा ऑडिट होते की नाही?

विजय वडेट्टीवार यांनी, "नागपूर मधील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीत भीषण स्फोट होऊन 12 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना त्वरित उपचार मिळावे. तसेच मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना सरकारने भरीव आर्थिक मदत केली पाहिजे. वारंवार या स्फोटाच्या घटना होऊन कामगारांच्या जीवावर बेतत आहे. या कंपनीच्या सुरक्षा ऑडिट होते की नाही? यासाठी जबाबदार लोकांवर कारवाई होणार की नाही??या भीषण अपघातात मृत पावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," असं म्हणत सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. 

कामगार संघटनेचं म्हणणं काय?

महाराष्ट्र बारूद कामगार संघटनेचे उपाध्यक्ष पीयूष फिस्टे यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त करतानाच मुलभूत सुविधाही उपलब्ध नव्हत्या असं म्हटलं आहे. "रुग्णवाहिका त्या ठिकाणी उपलब्ध नाही. अग्निशमन विभागाची एकही गाडी वेळेवर आली नाही. सोलर कंपनी मधून आग विझवण्याकरिता गाडी मागविण्यात आली. दोन ते तीन लोक गेट जवळ होते. ते लोक बाहेर पडू शकले. बाकीचे आतमधील लोक बाहेर पडू शकले नाहीत. सेफ्टीच्या नावावर इथे कोणत्याही गोष्ट नाहीत. कामगारांना छळण्यासारखी ही परिस्थिती होती. संघटनेच्या मार्फत त्या ठिकाणी अनेक वेळा पत्र व्यवहार करण्यात आले होते. तुम्ही सुरक्षेसंदर्भातील व्यवस्था करा मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ज्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या जबाबदारी होती असेही काही लोक यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा. शासनाकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की  कंपनीवर  कारवाई करण्यात यावी," असं फिस्टे यांनी म्हटलंय. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More