मोठी घडामोड! मनसेच्या समावेशास काँग्रेसचाही होकार, 'या' ठिकाणी मोठ्या निर्णयाची शक्यता

मुंबईत मनसेची जवळीक टाळणा-या काँग्रेसनं नाशिकमध्ये मात्र राज ठाकरेंच्या मनसेला जवळ केल्याचं स्पष्ट झालंय  

शिवराज यादव | Updated: Dec 18, 2025, 09:22 PM IST
मोठी घडामोड! मनसेच्या समावेशास काँग्रेसचाही होकार, 'या' ठिकाणी मोठ्या निर्णयाची शक्यता

नाशिकमध्ये महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश झाला आहे. त्यामुळे मुंबईत मनसेची जवळीक टाळणा-या काँग्रेसनं नाशिकमध्ये मात्र राज ठाकरेंच्या मनसेला जवळ केल्याचं स्पष्ट झालंय. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मनसेच्या समावेशास काँग्रेसचाही होकार

नाशिक महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या समावेशावरून अद्यापही घोळ कायम असल्याचे चित्र आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीत मनसेला समावेश करण्यास स्थानिक काँग्रेस नेत्यांनीही सहमती दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच मनसेसह मविआच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होऊन जागावाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्ष अॅक्शन मोड' वर आले आहेत. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादीने इच्छुकांच्या मुलाखतींचा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत अद्यापही घोळ कायम आहे. मविआत डाव्या पक्षांसह शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शप गट व काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. मात्र, राज्यात बदलत्या राजकीय समीकरणांनुसार मनसे व शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याने काही महिन्यांपासून महाविकास आघाडीत विघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली. मुंबईमध्ये याच मुद्द्यावरुन काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. 

'उबाठा'च्या मध्यस्थीने 'मविआ' बळकट लढण्याचा निर्णय घेतला. उर्वरित महाराष्ट्राबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार नाशिकमध्ये मविआत मनसेचा समावेश होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये या संदर्भात चर्चा झाली आहे. मनसेचा समावेश महाविकास आघाडीत करण्यासाठी काँग्रेस राजी झाले आहे. त्यामुळे लवकरच या सर्व पक्षांची एकत्र बैठक होऊन महाविकास आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

ताकदीअभावी माघार

नाशिकमध्ये काँग्रेसची ताकद शहरातील चार ते पाच प्रभागांपुरती मर्यादित आहे, ज्या भागात दलित व मुस्लिम मतदार अधिक आहेत. त्याचा अंदाज घेत, काँग्रेसने मनसेला विरोध करण्याचे धोरण सोडून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट व त्यापाठोपाठ मनसेला अधिक जागा देण्याचे धोरण स्वीकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More