)
देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील दोन ज्योतिर्लिंग मंदिरांना पावसाचा फटका बसला आहे. पुण्याजवळील भीमाशंकर आणि नाशिकमधील त्र्यंबकेश्वरचा संपर्क तुटला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने थैमान घातला आहे. मुसळधार पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आले आहे. मुसळधार पावसामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रोड बंद झाला असून संपर्क तुटला आहे.
पिंपळगाव बहुला परिसरात असलेल्या पुलावरून पाणी गेल्याने रस्ता बंद झाला आहे. गेल्या चार ते पाच तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्र्यंबकेश्वर-खोडाळा मार्गावरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या बाजूला मातीचा भराव टाकून तयार करण्यात आलेला कच्चा पूल पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे वाहून गेलाय. त्यामुळे 40 हून अधिक गावांचा संपर्क थेट तुटला आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहराशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला तुटल्यामुळे दूध उत्पादक, शेतकरी, शाळकरी विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाचे मोठे हाल होत आहेत.
नाशिकमध्येही पावसाचा थैमान घातलंय. गोदा घाट परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ आहे. मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचलंय. अनेक छोटे मंदिर पाण्याखाली गेले असून नाशिकमध्ये आज, उद्या पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे-नाशिक महामार्गावर पूरस्थिती असल्याने चाकण-वाकी परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेक वाहनं पाण्यात अडकली आहेत.
तिकडे पुण्याजवळील भीमाशंकर मंदिरालाही पावसाचा फटका बसला आहे. खेड तालुक्यात गुंडावलवाडी पुलाजवळ राजगुरुनगर-भीमाशंकर महामार्ग पुराच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आंबेगाव मार्ग घोडेगाव हा मार्गही बंद करण्यात आला आहे. भीमाशंकर मंदिराकडे जाणारे दोन्ही मार्ग बंद असल्याने या गावाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
तर मुसळधार पावसामुळे चाकण जलमय झालंय. बाजारपेठांसह अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.