राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची ईडी कार्यालयात सुमारे 8 तास चौकशी करण्यात आली

समता नागरी सहकारी पतसंस्थेतील मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने फास अधिक घट्ट केला आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची ईडी कार्यालयात सुमारे 8 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी खळबळजनक दावा केलाय.
समता पतसंस्थेतील बनावट खाती प्रकरणात रूपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकरांनी थेट अशोक खरातकडे बोट केलं आहे. या खात्यांची अजिबात कल्पना नव्हती अशी माहिती प्रतिभा चाकणकर यांनी ईडी चौकशीत दिली आहे. समता पतसंस्थेत अशोक खरातनं
जवळपास 100 जणांच्या नावावर खाती उघडली होती. या खात्यांच्या माध्यमातून त्यानं कोट्यवधींचा व्यवहार केल्याचंही समोर आलं होतं, या खात्यांमध्ये प्रतिभा चाकणकर आणि त्याच्या मुलाच्या नावावरही खाती होती, त्यामुळे ईडीनं प्रतिभा चाकणकरांची चौकशी केली आहे.
मुलाचं आणि माझं आधार-पॅनकार्ड धार्मिक कामासाठी खरातला दिलं होतं. या कागदपत्राचा गैरवापर करून अशोक खरातनं बनावट खाती उघडल्याचा चाकणकरांचा दावा आहे.
या खात्यांना अशोक खरातच नॉमिनी होता, तसंच मोबाईल नंबरही त्याचाच लिंक होता.
समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मयच्या नावावर एकूण चार खाती उघडण्यात आली होती, या खात्यांच्या माध्यमातून 2021 मध्ये 26 लाख रूपये वळवण्यात आले होते, तर 2024पर्यंत या रक्कमेवर 40 लाख रुपये परतावा मिळाल्याचा ईडीला संशय आहे..
एकूणच समता पतसंस्थेतील मनी लाँडरिंगचा हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. प्रतिभा चाकणकर यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धार्मिक श्रद्धेचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार झाला की यामागे आणखी काही मोठे मासे आहेत, हे आता ईडीच्या पुढील तपासात स्पष्ट होईलच.