जावयाने सासूला घातला 20 लाखांचा गंडा; लेकीसोबत नातवानंही फसवलं

Nashik Crime News: 9 जानेवारी रोजी नाशिकमधून सायबर गुन्हेगारांनी दोघांना 26  लाखांचा गंडा घातल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान याप्रकारची आणखी एक घटना आज (10 जानेवारी 2026 रोजी) घडली आहे. मात्र या घटनेत चक्क रक्तांच्या नात्यांनीच विश्वासघात केला आहे. मुलगी, जावई आणि नातवाने 65 वर्षांच्या सासूच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत तब्बल 20 लाखांचा गंडा घातला आहे. कशी घडली संपूर्ण घटना जाणून घ्या.   

Updated: Jan 10, 2026, 01:48 PM IST
जावयाने सासूला घातला 20 लाखांचा गंडा; लेकीसोबत नातवानंही फसवलं

Nashik: नाशिकच्या जय भवानी रोड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत जावई, मुलगी व नातवाने मिळून एका 65 वर्षीय वृद्ध महिलेला तब्बल 20 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. सासू  प्रमिला रमेश मैना या रेल्वे सेवेतून सन 2020 मध्ये सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेले 20 लाख रुपये त्यांनी कॅनरा बँकेत जमा केले होते. त्या आपल्या मुलगी कृष्णा चंडालिया व जावई राजेश चंडालिया यांच्यासोबत राहत होत्या. जावई राजेश याने पैशांची गरज असल्याचे सांगून सासूकडे एक लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी प्रमिला मैना यांनी “बँकेतून काढून देते” असे सांगितले असता, “तुमचे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत, काढता येणार नाहीत,” असे सांगून जावयाने त्यांची दिशाभूल केली.

Add Zee News as a Preferred Source

 

मुलगी, जावई आणि नातू या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

दरम्यान काही दिवसांनी पेन्शन काढण्यासाठी प्रमिला मैना बँकेत गेल्या असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे समोर आले. हा प्रकार मुलीला सांगितल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे देत आईला घराबाहेर काढून दिले. यानंतर मोठ्या मुलीसोबत बँकेत जाऊन स्टेटमेंट काढले असता, वेगवेगळ्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे ट्रान्स्फर झाल्याचे उघड झाले. जावई, मुलगी व नातवाने खोट्या सह्या करून खात्यातील पैसे परस्पर काढून घेतले होते. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मुलगी, जावई आणि नातू या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सायबर गुन्हेगारांकडून दोघांना 26 लाखांचा गंडा 

दरम्यान, नाशिकमध्ये फसवणूक करण्याची अशीच एक घटना 9 जानेवारी 2026 रोजी घडली. 'एपीके लिंक' पाठवून आरटीओ चलन अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून सायबर गुन्हेगारांनी दोघांना 26 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. गुन्हेगारांनी एपीके लिंक पाठवून आरटीओ चलन अॅप डाउनलोड करण्यास सांगितले गेले होते. अॅप डाउनलोड करताच बँक खात्यातून वेगवेळ्या खात्यांमध्ये सहा व्यवहार होऊन फिर्यादीचे 18 लाख 3 हजार 244 रुपये गायब झाले. दुसऱ्या महिलेलासुद्धा अशाचप्रकारे अॅप डाउनलोड करण्यास सांगून 8 लाख 2 हजार रुपये परस्पर ऑनलाइन लांबविले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तक्रारीवरून सायबर पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर मॅसेज पाठविणारा तसेच ज्या बँक खात्यांत पैसे जमा झाले त्या खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

 

सायबर पोलिसांकडून नागरीकांना जागृकतेचे आवाहन

आरटीओकडून कुठल्याही प्रकारची चलनाची वगैरे लिंक एपीके अथवा यूआरएल स्वरूपात पाठविली जात नाही, यामुळे आलेल्या सर्व लिंक या बनावट असतात. त्यावर विश्वास दाखवू नये, असे आरटीओ प्रशासनाकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे. लिंकवर क्लिक केल्यास मोबाइलचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे जातो, हे लक्षात ठेवावे. ऑनलाइन सायबर गुन्हेगारीचे प्रकार सातत्याने घडत असून नागरिकांनी कुठल्याही प्रकारे अनोळखी अॅप, लिंक डाउनलोड करू नये. तसेच कुठल्याही प्रकारची धमकी अथवा भीती दाखविल्यास घाबरून जाऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. 

About the Author