Nashik Crime News: नाशिकमध्ये मागील काही आठवड्यांपासून लैंगिक शोषणाचे वेगवेगळे गुन्हे समोर येत असताना आता इगतपुरीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...

Nashik Crime News: भोंदू अशोक खरात प्रकरणापाठोपाठ नाशिकमधून मल्टी नॅशनल कंपनीमध्ये धर्मांतराच्या नावाखाली महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराची प्रकरण राज्यभरात चर्चेत आहेत. असं असतानाच आता नाशिक जिल्ह्याला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी विचित्र घटना इगतपुरीमध्ये घडली आहे. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणामध्ये एका शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याने एका अल्वयीन मुलीसमोर अश्लील चाळे केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
इगतपुरी तालुक्यात सर्वतीर्थ टाकेद येथील एका शाळेत हा सारा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे आठवीच्या विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पीडित मुलगी भावासोबत शालेय कागदपत्रांवर मुख्याध्यापकांचा सही शिक्का घेण्यासाठी गेली होती. 'मुख्याध्यापक बैठकीत असून मी सही शिक्के घेऊन देतो,' असे सांगत आरोपी शिक्षकाने पीडितेच्या भावाला खोलीबाहेर उभे करून पीडितेला आतमध्ये खोलीतील कक्षात नेले.
कक्षात इतर कोणीही नसल्याची संधी घेत आरोपी शिक्षकाने मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव केले. 'मला तुझी छाती दाबू देत का?' असा प्रश्न विचारत आरोपी शिक्षकाने या अल्पवयीन मुलीसमोर अश्लील भाषा वापरली. शाळेतील शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. घडलेल्या प्रकराने घाबरलेल्या पीडित मुलीने तिथली कागदपत्रं हातात घेत ताबडतोब तिथून पळ काढला.
पालक घरी आल्यावर पीडित मुलगी रडत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. रडायला काय झालं अशी विचारपूस करत त्यांनी तिला विश्वासात घेतलं तेव्हा तिने रडत राहा प्रकार पालकांना सांगितला. सारा संतापजनक प्रकार ऐकून पीडितेचे पालक व गावातील लोकांनी तात्काळ शाळा गाठली आणि संबंधित शिक्षकाबरोबरच शाळा प्रशासनाला जाब विचारला. घोटी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ संशयित शिक्षकास ताब्यात घेतले आहे.
मागील वर्षी याच शाळेत 13 वर्षीय विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने अत्याचार केल्याची घटना घडली होती. सलग दुसऱ्यांदा शाळेत अशी घटना घडल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. घोटी पोलिस स्थानकात आरोपी शिक्षकाविरुद्ध पोस्को व विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालेय मुलांसोबत शाळेत होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबद्दल पालकांनी जागृक राहणं आवश्यक असल्याचं या क्षेत्राशी संबंधित समोपदेशक सांगतात. पालकांनी मुलांसोबत मनमोकळेपणे संवाद केला पाहिजे. असं झालं तर शाळेत घडलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टी पालकांसोबत शेअर करतात आणि अशा घटना घडल्या तर त्याची वाच्यता होते.