अशोक खरात प्रकरण: SIT ने 15 मिनिटांत संपवली पत्रकार परिषद, तेजस्वी सातपुते यांनी नेमके काय गौप्यस्फोट केलेत?

SIT Press Conference on Ashok Kharat: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी विशेष तपास पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तपासाबद्दल माहिती दिली.   

शिवराज यादव | Updated: Apr 7, 2026, 06:31 PM IST
अशोक खरात प्रकरण: SIT ने 15 मिनिटांत संपवली पत्रकार परिषद, तेजस्वी सातपुते यांनी नेमके काय गौप्यस्फोट केलेत?

SIT Press Conference on Ashok Kharat: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी विशेष तपास पथक (SIT) तपास करत आहे. दरम्यान तपास सध्या कुठपर्यंत पोहोचला आहे याची माहिती एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी तपास कोणत्या दिशेने सुरु आहे याची माहिती दिली. पण त्यांनी अद्यापही तपास सुरु असल्याने तसंच प्रकरण संवेदनशील असल्याने सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. फक्त 15 मिनिटातच त्यांनी पत्रकार परिषद थांबवली. नेमकं त्यांनी काय सांगितलं जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

11 गुन्ह्यांचा एसआयटीकडून तपास

"पोलीस महासंचालकांनी अशोक खरात आरोपी असलेल्या गुन्ह्याचा तपास एसआयटी मार्फत करण्याचा आदेश दिल्याने 20 मार्चपासून या व इतर 10 अशा एकूण 11 गुन्ह्यांचा एसआयटी तपास करत आहे. या पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून 2 पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक तपास अधिकारी म्हणून 3 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असे 24 जणांचे पथक आहे," अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली. 

हेदेखील वाचा - 2 महिन्याचा पगार, अतिरिक्त 50 हजार, रजेचा मोबदला...; Oracle ने भारतात नोकरीवरुन काढलेल्या कर्मचाऱ्यांना दिला भरपाई, सेवरेंस पॅकेज ऐकून बसेल धक्का

 

पुढे त्यांनी सांगितलं की, "अशोक खरातविरोधात नाशिक आणि नगर येथे मिळून 12 गुन्हे दाखल असून, 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. एका गुन्ह्याचा तपास नाशिक आणि दोन गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत. अशोक खरात विरोधात नसलेल्या, पण विषयाशी संबंधित 2 गुन्ह्यांचा तपासही एसआयटी करत आहे".

30 पेक्षा जास्त जणांची साक्ष 

"महिला लैंगिक अत्याचाराचे 8 गुन्हे आणि फसवणूक, अंधश्रद्धा यासंदर्भातील एका गुन्ह्याचा तपास एसआयटी करत आहे. 30 पेक्षा जास्त जणांची साक्ष नोंदवली आहे. आरोपी पीडित कुटुंबाच्या अंधश्रद्धेचा गैऱफायदा घेत, भीती दाखवत, खडे, चिंचुके, रुद्राक्ष, पूजा , विधी याच्या माध्यमातून पैसे उकळत होता. तसंच महिलांना दैवी शक्त्ती असल्याचं भासवून, कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून लैंगिक शोषण करत होता. तसंच ईशान्येश्वर मंदिरात अंदारात हातचालाखीने आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत होता," असंही त्यांनी सांगितलं. 

'4650 लिंक डिलीट केल्या'

पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवणं हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी गरजेचं आहे. न्यायालयानेही ही भूमिका मांडली आहे. पीडितेच्या गोपनीयतेचा भंग झाला आहे त्या लिंक हटवण्याचा आदेश दिला आहे. अत्याचाराच्या पीडितेची ओळख करणाऱ्यांना शिक्षा होऊ शकते सांगत त्यांनी कलमं वाचून दाखवली

"एसआयटीकडे असणाऱ्या गुन्ह्यातील पीडितांच्या आक्षेपार्ह व्हिडीओच्या 4650 हजार लिंक्स सायबर टीमने डिलीट केल्या आहेत. तसंच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वारंवार टाकणाऱ्या 451 अकाऊंटना कायमस्वरुपी बंद केलं आहे. पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत 2 गुन्हेही दाखल झाले आहेत. आजपर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे," अशी माहिती त्यांनी दिली. 

एसआयटीकडील तपास संवेदनशील असल्याने अधिक माहिती देऊ शकत नाही सांगत त्यांनी जास्त माहिती देण्यास नकरा दिला. गुन्हा दाखल झाल्यापासून 60 दिवसांच्या आत दोषारोपत्र दाखल करणं गरजेचं असतं. 17 मार्चला पहिला गुन्हा दाखल झाला. 20 तारखेला एसआयटीकडे तपास आला. सर्व गुन्ह्यांची डेडलाइन संपत आहे असंही त्यांनी सांगितलं. 

दाखल गुन्ह्यात फिर्यादी सांगतात त्याप्रमाणे तपास होता. पुराव्याच्या आधारे पुढील तपास होतो. त्यानुसार संबधित आणि सह-आरोपींवर कारवाई होते. कोणी मदत केली आहे का हे तपासात समोर आढळल्यास कारवाई केली जाईल. तपास अजून सुरु आहे. चार्जशीट दाखल होईपर्यंत गोपनीयात बाळगावी लागणार आहे असं त्या म्हणाल्या. 

पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयाला विनंती करणार आहोत. खरातच्या आर्थिक व्यवहार, प्रॉपर्टी याची ईडीने दखल गेतली आहे. आम्ही त्यांना सर्व माहिती पुरवली आहे. भविष्यातही त्यांना सहकार्य केलं जाईल असं सांगताना त्यांनी भविष्यात महिलांचा लैंगिक शोषण होऊ नये, भोंदूंना बळी पडू नये असं आवाहन केलं आहे. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More