Nashik Accident : दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू, बापाला केलेली मदत ठरली शेवटची

SSC Student Car Accident : नाशिकमध्ये अतिशय दुर्दैवी घडना घडली आहे. वडिलांना मदत करायला गेलेल्या तरुणाचा करुण अंत झाला आहे. सोमवारी पहिला पेपर होता. मात्र रविवारी वडिलांनी उसाच्या रसाच्या गाडीवर मदत करायला गेला असता काळाचा घाला घातला गेला. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 23, 2026, 02:58 PM IST
Nashik Accident : दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू, बापाला केलेली मदत ठरली शेवटची

रविवारी दुपारी पेठ रस्त्यावरील तवली फाटा येथे एका भीषण अपघातात मयूर सुरेश भोये (15) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मयूर रस्त्यालगत उसाच्या रसाचा गाडा चालवत असताना एका भरधाव कारने त्याला जोराची धडक दिली. मयूरची सध्या दहावीची परीक्षा सुरू होती. सुटीच्या दिवशी वडिलांना कामात मदत करत असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातली. या घटनेमुळे भोये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुपारी 4 वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर मोकळ्या जागेत वडिलांना उसाचा रस काढण्यास मदत करणाऱ्या मयूर सुरेश भोये (15) या विद्यार्थ्याला भरधाव कारने (MH 15 KK 6464) जोरदार धडक दिली.

अपघातानंतर वडिलांनी मयूरला तातडीने रिक्षाद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासात मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित कारचालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. दहावीची परीक्षा सुरू असतानाच मयूरचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्याचा करुण अंत 

डोंबिवली येथे राहणाऱ्या 18 वर्षीय बारावीच्या विद्यार्थ्याचा रेल्वे अपघातात झालेला मृत्यू ही अत्यंत हृदयद्रावक घटना 10 फेब्रुवारी 2026 रोजी घडली. सोहम सचिन कटरे (वय १८), रा. लक्ष्मणनगर, तवली फाटा, पेठ रोड येथे राहणारा होता. ही घटना मंगळवारी 10 फेब्रुवारी) सकाळी 9.55 च्या सुमारास कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. सोहम बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा (इंग्रजी विषय) पहिलाच पेपर देण्यासाठी कळवा येथील मनीषा विद्यालय या परीक्षा केंद्रावर जात होता. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे सोहमचा पाय घसरला किंवा त्याचा तोल गेला आणि तो धावत्या गाडीतून खाली पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ठाणे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच सकाळी 10.30 च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ठाणे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More