चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा इंग्लंडवर रोमहर्षक विजय

यंग टीम इंडियाने यजमान इंग्लंडचा ५ रन्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. तब्बल ११ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत भारताने इतिहास रचलाय

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 24, 2013, 09:51 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, बर्मिंगहॅम
यंग टीम इंडियाने यजमान इंग्लंडचा ५ रन्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. तब्बल ११ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत भारताने इतिहास रचलाय. वर्ल्डकप पाठोपाठ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत टीम इंडियाने आपणच वन-डेमधील दादा आहोत हे दणक्यात दाखवून दिलंय.
धोनीनं घडवला इतिहास
या विजयामुळे टी-२० वर्ल्डकप, वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही महत्त्वाच्या आयसीसी ट्रॉफी जिंकणारा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी जगातला पहिला क्रिकेट कॅप्टन ठरलाय.
कसा मिळवला विजय
टीम इंडियाचे शिलेदार चॅम्पियन्स ट्रॉफी उचलतानाचं दृश्यं पाहिल्यावर कदाचित तुम्हाला स्वतःला चिमटा काढून जागं करावं लागेल. कारण पावसामुळे जवळपास रद्द होण्याच्या बेतात असलेली चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल इतकी रंगतदार होऊ शकते यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही. एजबॅस्टनच्या मैदानावर झालेल्या या सामन्याकडे अवघ्या भारताचं लक्ष लागलं होतं. पावसाच्या व्यत्ययानंतर २०-२० ओव्हर्सच्या झालेल्या या सामन्यात अखेर टीम इंडियाने दाखवून दिलं की सध्या हीच टीम जगातील सर्वोत्तम टीम का आहे. यजमान इंग्लंडचा ५ रन्सने पराभव करत टीम इंडियाने क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलंय.

इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मात्र, लगेचच पाऊस आल्याने रंगतदार फायनलची अपेक्षा करणाऱ्या क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. इतक्या महत्त्वाच्या सामन्यासाठी राखीव दिवस आयसीसीने न ठेवल्याबद्दल अनेक क्रिकेटप्रेमींनी नाराजीही व्यक्त केली. पण अखेर २० ओव्हर्सची मॅच खेळण्याचा निर्णय घेण्यात आला.
पावसामुळे पिच क्रिकेट खेळण्यासाठी निश्चितच कठीण झालं होतं. त्यामुळे रन्स जमवणं तितकसं सोपं ठरणार नाही असंच भाकीत समीक्षकांनी व्यक्त केलं होतं. संपूर्ण स्पर्धेत आपल्या बॉलिंगने बॅट्समनच्या मनात धडकी भरवणारा जेम्स अँडरसन टीम इंडियासाठी धोकादायक ठरेल असं वाटत असतानाच रवी बोपाराने आपल्या बॉलिंगने भारतीय फलंदाजांना नाचवलं. त्याने २० रन्समध्ये ३ विकेट घेत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडलं. स्पर्धेत सातत्याने रन्स बनवणाऱ्या शिखर धवनन पुन्हा एकदा ३१ रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण टीम इंडियाने इंग्लंडला दिलेल्या १३० धावांच्या टार्गेटमध्ये विराट कोहलीच्या ४३ रन्स सगळ्यात महत्त्वाच्या ठरल्या. त्याने रवींद्र जाडेजाबरोबर ६ व्या विकेटसाठी ४७ रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप करत एक आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली.

प्रत्युत्तरादाखल खेळायला उतरलेल्या इंग्लंडची सुरुवातीलाच भंबेरी उडाली. उमेश यादवने इंग्लिश कॅप्टन कूकला अवघ्या २ रन्सवर बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर बेल, ट्रॉट आणि ज्यो रुटही फारशी कमाल दाखवू शकले नाही आणि इंग्लंडची स्थिती पाहता पाहता ४ बाद ४६ अशी झाली. त्यामुळे टीम इंडिया आता हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. पण, मॉर्गन आणि बोपाराच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. आक्रमण आणि बचाव यांचा सुंदर मिलाफ घालत या पेअरने वेगाने रन्स जमवायला सुरुवात केली आणि पाहता पाहता सामना भारताच्या हातून निसटतेय का काय अशी परिस्थिती निर्माण झाली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६४ रन्सची भागिदारी करत अख्ख्या भारताला टेन्शन दिलं. मात्र, इशांत शर्मा टाकत असलेली इनिंगमधली अठरावी ओव्हर चांगलीच नाट्यपूर्ण ठरली. मॉर्गने सिक्स मारत ओव्हरची चांगली सुरुवात केली. मात्र नंतर अतिशय खराब फटका मारत स्वतःची विकेट गमावली. पुढच्याच बॉलवर रवी बोपाराही पॅव्हेलियनमध्ये परतला आणि भारताने पुन्हा सामन्यावर पकड मिळवली त्यानंतर इंग्लंडच्या विकेट्स पडत गेल्या आणि भारताने ५ विकेट्सने विजय मिळवत इतिहास घडवला. रवींद्र जाडेजा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला तर शिखर धवनने ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार पटकावला. उत्तराखंडमध्ये झालेल्या महाप्रलयात जीव गमावलेल्यांना हा पुरस्कार समर्पित करत शिखरने पीडितांच्या मनावर हळूवार फुंकर घातली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.