मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना `टोल`वलं...

राज्याचं नव टोल धोरण लवकरच आणू, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं खरं... पण, पाळलं मात्र नाही...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 5, 2014, 08:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्याचं नव टोल धोरण लवकरच आणू, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं खरं... पण, पाळलं मात्र नाही... आणि आता तर आचारसंहिताही लागू झालीय त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत तरी हे आश्वासन पूर्ण होण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना चांगलंच `टोल`वलं असं म्हणायला हरकत नाही.
साध्या सोप्या भाषेत म्हणायचं तर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना सरळसरळ गंडवल्याचंच दिसतंय. गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंनी टोलचा प्रश्न आक्रमकपणे मांडला होता. त्यासाठी १२ फेब्रुवारीला राज्यव्यापी आंदोलन करत स्वतः राज ठाकरे रस्त्यावरही उतरले होते. त्यानंतर अखेर मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली आणि टोलधोरण लवकरच आणण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. पण, अखेर राज ठाकरेंनी टोलप्रश्नी एवढं सगळं करुनही मुख्यमंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. आता आचारसंहिता लागल्यामुळे कुठलाच निर्णय शक्य नाही.
साहजिकच, या निवडणुकीत राज ठाकरेंना टोलप्रश्नाचं क्रेडिट मिळणार नाही.   आता याचा बदला राज कसा घेणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.