लहान वयात केस पांढरे होत असतील तर करा हे उपाय

लहान वयामध्येच अनेकांचे केस पांढरे होतात. तणाव, चिंता, चुकीचा आहार, अनुवंशिक दोष आणि प्रदुषण ही केस पांढरे व्हायची प्रमुख कारणं आहेत. 

Updated: Jun 11, 2016, 10:55 PM IST
लहान वयात केस पांढरे होत असतील तर करा हे उपाय title=

मुंबई : लहान वयामध्येच अनेकांचे केस पांढरे होतात. तणाव, चिंता, चुकीचा आहार, अनुवंशिक दोष आणि प्रदुषण ही केस पांढरे व्हायची प्रमुख कारणं आहेत. पांढरे केस लपवण्यासाठी अनेक जण ते कलर किंवा डाय करतात पण नैसर्गिक उपायांनीही तुमचे केस पांढरे होणं थांबवता येऊ शकतं. या घरगुती उपायांवर एक नजर टाकूयात. 

आवळा

केस पांढरे होणं थांबवण्यासाठी आवळा मदत करतो. यामुळेच तेल आणि शाम्पूमध्येही आवळ्याचा वापर केला जातो. नारळाच्या तेलामध्ये आवळ्याचे तुकडे टाका, हे तुकड्यांना काळा रंग येईपर्यंत ते मिश्रण गरम करा आणि डोक्याला लावा. याबरोबरच आवळ्याचा रस पिला तरीही केस पांढरे होणं कमी होतं. 

कांदा

गळणारे आणि पिकणारे केस थांबवण्यासाठी कांदा हा उपाय आहे. कांद्यामध्ये कॅटालेस एंजाईम मोठ्या प्रमाणावर असतं. केस पांढरे होत असतील तर अर्धा कांदा घेऊन तो डोक्यावर चोळा किंवा कांद्याचा रस डोक्याला लावा आणि एका तासानंतर शाम्पूनं केस धुवा. 

मेहंदी

केस पांढरे होणं थांबवण्यासाठी डोक्याला मेहंदी लावा. मेहंदी लावताना बनवण्यात येणाऱ्या मिश्रणामध्ये एरंडाचं तेल आणि लिंबाचा रस टाका आणि एक तासापर्यंत हे मिश्रण तसंच ठेवून मग ते डोक्याला लावा. 

मेथीचे दाणे

मेथीच्या दाण्यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे केस पांढरे होणं कमी होतं. पिण्याच्या पाण्यामध्ये थोडे मेथीचे दाणे टाकून हे पाणी गरम करा आणि रोज एक ग्लास हे पाणी प्या. मेथीचे दाणे आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट डोक्याला लावा. 

तिळाचे दाणे

तिळाचे दाणे बदामाच्या तेलात टाकून हे मिश्रण डोक्याला लावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवा, यामुळे तुमचे केस पांढरे व्हायचं प्रमाण कमी होईल.