'लालू काँग्रेसचे तळवे चाटणारा नेता'

मुझफ्फरनगरच्या दंगलग्रस्त छावण्यांना राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी दिलेली भेट चांगलीच गाजतेय. यावरून मुलायमसिंह यांना मात्र लालुप्रसाद यादव यांच्यावर तोंडसुख घेण्याची आयती संधी मिळालीय... आणि त्यांनी लागलीच ती अंमलातही आणली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 2, 2014, 07:39 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, लखनौ
मुझफ्फरनगरच्या दंगलग्रस्त छावण्यांना राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी दिलेली भेट चांगलीच गाजतेय. यावरून मुलायमसिंह यांना मात्र लालुप्रसाद यादव यांच्यावर तोंडसुख घेण्याची आयती संधी मिळालीय... आणि त्यांनी लागलीच ती अंमलातही आणली.
‘लालुप्रसाद हे काँग्रेसचे तळवे चाटणारे नेते आहेत’ अशी खरमरीत टीका मुलायमसिंग यादव यांनी केलीय. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी भेट दिली हेती. यावर मुलायमसिंह म्हणाले, ‘दंगलग्रस्तांना सर्व मदत आमच्या सरकारने केली; मात्र इतर सर्व जण या मुद्‌द्‌यावरून राजकारण करत आहेत. काही जण तुरुंगातून सुटल्यानंतर लगेच दंगलग्रस्तांच्या भेटीला आले...’ असं म्हणताना मुलायमसिंह यांचा सरळ सरळ रोख लालूप्रसाद यादव यांच्यावर होता.
मुलायम सिंह समाजवादी पक्षाचे नेते राजनारायण यांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. सत्ता मिळविण्यासाठी लालूप्रसाद वेगवेगळ्या पक्षांची बाजू घेतात, असा आरोप करून मुलायम सिंहांनी त्यांच्यावर, ‘वो काँग्रेस के तलवे चाट रहे है, उन की चापलूसी कर रहे है` अशी टीका केली. मात्र, समाजवादी पक्षाच्या लोकांनी कधीही सत्तेसाठी आपले धोरण बदलले नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटलंय.
मुलायम सिहांच्या या वक्तव्याला लालुप्रसाद यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘मी कालही काँग्रेससोबत होतो, आत्ताही आहे आणि भविष्यातही राहीन... दंगलपीडित लोक शिबिरांमध्ये अडचणींचा सामना करीत आहेत. परंतु, मुलायमसिंग मात्र मौज करीत आहेत. त्यांनी रात्रभर सैफईमध्ये नृत्य पाहिलंय... त्यांची अजूनही धुंदी उतरली नाही’ असं प्रत्युत्तर लालुंनी दिलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.