जगाला मदतीची साद घालणारी 'ती' चिमुरडी सुरक्षित?

केवळ ट्विटरच्या माध्यमातून भेटणारी मात्र सगळ्या जगाला आपलीशी वाटणारी सीरियातल्या अलेप्पोची बाना अल अबेद ही अवघ्या सात वर्षांची मुलगी संकटात आहे... तिच्या ट्विट्समधून तिनं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवलाय... काय झालंय या चिमुरडीचं... ती सुरक्षित आहे का?  

Updated: Dec 7, 2016, 03:17 PM IST
जगाला मदतीची साद घालणारी 'ती' चिमुरडी सुरक्षित?  title=

नवी दिल्ली : केवळ ट्विटरच्या माध्यमातून भेटणारी मात्र सगळ्या जगाला आपलीशी वाटणारी सीरियातल्या अलेप्पोची बाना अल अबेद ही अवघ्या सात वर्षांची मुलगी संकटात आहे... तिच्या ट्विट्समधून तिनं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवलाय... काय झालंय या चिमुरडीचं... ती सुरक्षित आहे का?  

बाना अल अबेद असं या चिमुरडीचं नाव... सीरियामधल्या अलेप्पो शहरात सरकारी सैन्य आणि आयसिस अतिरेक्यांच्या धुमश्चक्रीत ट्विटरवरून जवळपास दररोज जगाला मदतीची साद घालणारी ही चिमुरडी...

नोव्हेंबरमध्ये तिचा एक ट्विट होता... 'आम्हाला खात्री आहे की लष्कर आम्हाला लवकरच पकडेल... आपण लवकरच भेटू असं वाटतंय... बाय...' असं तिनं या ट्विटंमध्ये म्हटलं होतं. 

बानाच्या अकाऊंटला जगभरातले तब्बल २ लाख ११ हजार फॉलोअर्स आहेत. या ट्विटमुळे सुखरूप असलेली बाना लवकरच भेटेल, अशी तिच्या हजारो चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र २७ नोव्हेंबरच्या एका ट्विटमुळे तिची काळजी करणाऱ्यांच्या काळजात धस्स झालं. 

अकाऊंट बंद होण्यापूर्वी बानाचे ट्विटस्...

'आज रात्री आमच्याकडे घर नाही... ते नष्ट झालंय आणि मी धुळीनं माखलीय... मी मृत्यू पाहिलाय. मी जवळजवळ मेलीय...' असं ते काळजाचा ठोका चुकवणारं ट्विट होतं. 

त्यानंतर पुन्हा एकदा, 'हा शेवटचा मेसेज. खूप मोठ्या बॉम्ब वर्षावाखाली आहे. आता आणखी जिवंत राहू शकत नाही...' त्यानंतर २८ नोव्हेंबरला आणखी एक मेसेज आला... 'लष्कर पुढे आलंय... आपण बोलतोय त्याचा हा बहुदा अखेरचा दिवस... इंटरनेट नाहीय. प्लीज प्लीज प्लीज आमच्यासाठी प्रार्थना करा... जोरदार बॉम्बवर्षावात अडकलो आहोत... जन्म आणि मृत्यूमध्ये लटकलोय. आमच्यासाठी प्रार्थना करत राहा'

या मॅसेजनंतर तिच्या अनेक फॉलोअर्सचा ठोका चुकला... २४ तासांमध्ये तिचं ट्विटर हँडलही डिलिट झाल्याचं आढळलं आणि चिंतेत आणखीनच भर पडली. 'व्हेअर इज बाना' नावाचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करू लागला. सीरियाच्या सैन्यानं केलेल्या हल्ल्यात बानाचं काहीतरी बरं-वाईट झालं, अशी शंका अनेकांना येऊ लागली.

...आणि बाना पुन्हा ट्विटरवर परतली

यानंतर बानानं पुन्हा एकदा ट्विट केलं... आणि आपण सुखरूप असल्याचं म्हटलं. 

बाना सुखरुप - वृत्तसंस्था

मात्र, सैन्य पुढे आल्यानंतर बानाला कुटुंबियांसह मागे हटावं लागलं, पण बाना सुखरूप आहे असं वृत्त 'असोसिएटेड प्रेस' या वृत्तसंस्थेनं दिलं. या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीनं बानाचे वडील घस्सान यांच्याशी फोनवरून संपर्क साधला.

हा आयसिसचा बनाव?

एकीकडे बानाच्या सलामतीसाठी जगभरात दुवा सुरू असताना सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांनी मात्र बानाचे ट्विट्स हा आयसिसचा बनाव असल्याचा दावा केलाय. सत्य काय ते कदाचित बाहेर येईलही पण, सगळ्या जगासाठी युद्धाच्या खाईत अडकलेली ही चिमुरडी सध्या सुरक्षित आहे. पण आणखी किती दिवस, हाच काळजीचा मुद्दा...