मुंबई : सुपरहिट 'दंगल' चित्रपटात छोट्या गीता फोगटची भूमिका करून वाहवा मिळवणारी झायरा वसीम वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. मूळची काश्मिरी असलेल्या झायरानं जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली. त्यानंतर काही फुटिरतावाद्यांनी सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू केली. त्यामुळे बावरलेल्या झायरानं आधी माफीच मागितली आणि मग ती पोस्ट डिलिट केली... आता तमाम बॉलिवूडसहीत काश्मीरचा पहिला वहिला आयएएस अधिकारी शाह फैजलदेखील झायराच्या समर्थनार्थ पुढे आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगल या सिनेमात बालपणीच्या गीता फोगटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री झायरा वसिमनं शनिवारी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली होती. या भेटीवर कश्मिर खोऱ्यातील कट्टरपंथीयांचा एक मोठा वर्ग नाराज झाला होता. झायरावर अनेकांनी सोशल मीडियावर टीका करण्यास सुरुवात केली होती. या ट्रोलमुळे दुखावलेल्या झायराने लगेचच सोशल मीडियाच्या माध्यमातून माफीनामा दिला होता. मात्र, तिने हा माफीनामा अवघ्या तीन तासांतच आपल्या फेसबुक प्रोफाईलवरुन हटवल्याने अनेक सवाल उपस्थित होत आहेत. माफीनाम्यात झायराने दिलगिरी व्यक्त केली होती.


झायराचा माफिनामा...


'मी नुकतीच ज्यांना भेटले, त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर मी ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांची जाहीर माफी मागते. मात्र, अनेकवेळा परिस्थितीच्या मागे कुणाचेच काही चालत नाही, हे समजून घेण्याची अपेक्षा मी व्यक्त करते. मी 16 वर्षीय असल्याने, हे समजून माझ्यासोबत तसाच व्यवहार करावा. मी जे काही केले, त्यावर मी सर्वांची माफी मागते. कारण माझ्याकडून अनावधानाने चूक घडली. मला सर्वजण माफ करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. तसंच मला कुणीही रोल मॉडेल समजू नये' - झायरा वासिम, अभिनेत्री


झायराचा फेसबुकवर माफिनामा 

झायराच्या पाठीशी बॉलिवूड !


दंगलमधील आपल्या धाडक परफॉमन्सने सगळ्यांचेच लक्ष झायराने लक्ष वेधले होते. आता ज्या पद्धतीने झायराला ट्रोल करण्यात आलं ते योग्य नाही, असं म्हणतं अनेक दिग्गज झायराच्या पाठिशी उभे राहिले आहेत.


'आजादी'च्या नावाने शंख करणारे एखाद्याला किंचितशी आजादी देऊ शकत नाही. बिच्चारी झायरा वसिम..  तिला आपल्या यशासाठी माफी मागावी लागतेय. लज्जास्पद आहे सारं, अशी प्रतिक्रिया लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केलीय.


आमिरनंही दिला पाठिंबा...


दंगलमध्ये झायराच्या वडलांची भूमिका करणाऱ्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननेही उशीरा का होईना झायराला पाठिंबा दिलाय. 'मी झायराची पोस्ट वाचली. तिला अशा प्रकारची पोस्ट का लिहावी लागली हे मी समजू शकतो .झायरा तु घाबरु नकोस आम्ही तुझ्यापाठीशी आहोत. तुझ्यासारखी हुशार, धाडसी मुलगी केवळ भारतच नव्हे तर जगभरातील तरुणांसाठी रोल मॉडेल आहे. झायराला तिचं आयुष्य जगू द्या' असं आमिरनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. इतकंच नाही तर, फोगट भगिनींनीही झायराचं समर्थन केलं असून हे सगळं दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. 


याबरोबरचं अनुपम खेर, रेणुका शहाणे, सोनू निगम, स्वरा भास्कर या सेलिब्रिटींनीही झायराला पाठिंबा दिला आहे. #zairawasim या हॅशटॅगसहीत अनेकांनी झायराच्या समर्थमार्थ पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे आता ही धाकड गर्ल हे सगळं प्रकरण कशा पद्धतीने हाताळते हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.