पुण्यात इच्छुकांची कमळालाच पसंती
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया सध्या सर्वच पक्षांमध्ये सुरु आहे.
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया सध्या सर्वच पक्षांमध्ये सुरु आहे. त्यात कोणी पुढे तर कोणी मागे आहे. तीच अवस्था इच्छुकांच्या संख्येबाबतही आहे. अपेक्षेप्रमाणे पुण्यात भाजपच्या इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, तर इतरांच्या इच्छूकांमध्ये उल्लेखनीय म्हणावी इतकी घट झालीय.
गेल्या २ दिवसांपासून पुण्यामध्ये भाजपच्या मुलाखती सुरु आहेत. २०१२ मध्ये भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छूक असणाऱ्यांची संख्या ८०० होती. यावेळी हा आकडा सुमारे ३० टक्क्यांनी वाढून ११०० वर गेलाय. भाजपमध्ये उमेदवारी मिळवणं जितकं अवघड झालय, तितकंच योग्य उमेदवार निवडणंही आव्हानात्मक ठरणार आहे.
सध्या महापालिकेत सत्ता असलेल्या राष्ट्रवादीचा जोर यावेळी काहीसा ओसरला असल्याचं चित्र आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी ७५० जणांनी मुलाखती दिल्या होत्या. यावेळी मात्र ५९५ इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत. तीच अवस्था मनसेची आहे. मनसेच्या इच्छुकांची संख्या ८५० वरून ५२५ वर आलीय. या दोन्ही पक्षांतील गेल्या वेळचे कित्येक इच्छूक यावेळी भाजपकडे गेले आहेत.
यावेळी शिवसेनेच्या इच्छुकांची संख्या ५०० हुन ६०० वर गेलीय. शिवसेनेसाठी ही समाधानाची बाब म्हणता येईल. काँग्रेसची अवस्था मात्र गेल्या वेळेपेक्षा खराब आहे. २०१२ मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ६५६ जण इच्छूक होते. यावेळी ५८७ इच्छूकांनी मुलाखती दिल्या आहेत.
सध्या शहरातील राजकीय वारे कुठल्या दिशेनं वाहत आहे याचा अंदाज या आकड्यांवरून येतो. असं असलं तरी वातावरण बदललं की वाऱ्याची दिशादेखील बदलत असते हे देखील ध्यानात ठेवावं लागेल.