भोसरी :  अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या उद्योजक पतीचा त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी उद्योजकाकडे कामाला असलेला पूर्वाश्रमीचा वाहनचालक आणि पत्नीला पोलिसांनी गजाआड केले. भोसरी एमआयडीसी भागात गुरुवारी १५ सप्टेंबर रात्री झालेल्या उद्योजकाच्या खूनचा छडा अवघ्या ४ दिवसात लावण्यात पोलिसांना यश आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय सुभेदार पवार (वय ४५, रा. आळंदी रस्ता, भोसरी) असे खून झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी कांचन विजय पवार (वय ३७) आणि सत्यवान सखाराम जाधव (वय ४५, रा. मोरगांव, बारामती) यांना अटक करण्यात आली.


पवार यांची भोसरी एमआयडीसीत भागीदारीत शिवम फॅब्रिकेशन ही कंपनी आहे. आरोपी सत्यवान हा पवार यांच्याकडे चालक म्हणून कामाला होता. पवार दाम्पत्याला एक मुलगा आहे. पवार यांची पत्नी कांचन आणि सत्यवान यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले होते. आठ महिन्यांपूर्वी सत्यवान याने नोकरी सोडली आणि जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू केले.


दरम्यान, अनैतिक संबंधात अडथळा ठरणारे पवार यांचा खून करण्याचा कट त्याने कांचनच्या मदतीने रचला.


गुरुवारी रात्री पवार कंपनीत झोपले होते. कांचनने ही माहिती सत्यवानला दिली. झोपेत असलेल्या पवार यांच्या डोक्यात हातोडा घालून सत्यवान पसार झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.


तपासात पोलिसांना सत्यवान आणि कांचन यांच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी संशयावरून कांचनची चौकशी सुरू केली. तेव्हा तिने प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून केल्याची कबुली दिली.