धुळे, अमरावती : सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाल्याने या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. ५ हजार कोंबड्याच्या मृत्यू झाला असून पुढचे ४ दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. तर अमरावतीमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.
 
धुळे जिल्ह्यातील बुरजड गावात प्रशांत पाटील या तरूण शेतकऱ्याच्या पाच हजार कोबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू झालाय. वादळी वा-यासह झालेल्या पावसानं आणि गारपिटीमुळे या पिल्लांचा जीव घेतलाय. त्यामुळे पाटील पावसाच्या या तडाख्यामुळे पूर्ण कोलमडलेत. पाटील यांच्या शेडमध्ये मेलेल्या कोंबड्यांच्या पिल्लांचा खच पडला आहे.  त्यातच योग्य पंचनामा न झाल्याने त्यांचं होत्याचं नव्हतं झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यालाही या पावसाचा फटका बसला असून शेतात आणि चाळीत ठेवलेला कांदा या पावसामुळे भिजून गेलाय. जिल्ह्यात शिंदखेडा, धुळे आणि पिंपळनेर भागात या अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला असून या भागात अनेक घरांचे छत उडालेत.


अमरावती पावसाची रिमझिम 


अमरावती शहरात आज दुपारपर्यंत प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र दुपारी तीननंतर अचानक ढगाळ वातावरण झालं आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. अमरावतीत आल्हाददायक वातावरण झालं असून उन्हाच्या तडाख्यापासून थोडाफार दिलासा मिळालाय.


विदर्भ मराठवाड्यात पाऊस कोसळणार!


विदर्भ, मराठवाडासह उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये येत्या दहा तारखेपर्यंत पाऊस अपेक्षित आहे. कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला आहे. मध्य प्रदेशपासून थेट केरळपर्यंत द्रोणीय भाग पटटा निर्माण झाला आहे. त्यामुळे चक्रवात परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी विदर्भ, मराठवाडा, तसंच उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागांत  दहा तारखेपर्यंत पाऊस पडेल. तर काही भागांत दोन दिवस गारपिटीची शक्यताही कुलाबा वेधशाळेनं वर्तवलीय.