मुंबई : ऐन दिवाळीत विक्रोळी, पवई, नाहूर, भांडुप परिसरात कचरा उचलणाऱ्या पालिकेच्या कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन केलंय. यामुळे या संपूर्ण विभागात कचराच कचरा दिसतो आहे.
दिवाळी बोनस आणि इतर थकबाकी न मिळाल्याने सुमारे १५० कामगारांनी कामबंद आंदोलन केलंय.
पालिकेने दत्तक वस्ती योजनेअंर्तगत काही संस्थांना कचरा उचलण्याची कंत्राटे दिली आहेत. पालिका या संस्थांना वेळेत त्याचा मोबदलादेखील देते. परंतु या संस्था त्यांच्या कंत्राटी कामगारांना त्यांची देणी देत नाहीत.
सणासुदीच्या काळात मिळणारा बोनस देखील न मिळाल्याने आज कामगार संतप्त झाले. त्यांनी विक्रोळी टागोरनगर पालिका चौकी समोर कामबंद आंदोलन केले.
पालिका अधिकारी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया कॅमेरा समोर देण्यास तयार नाहीत. 'हा संस्था आणि त्यांच्या कामगारांचा विषय आहे आमचा नाही' असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
ऐन दिवाळीत कामगार संतप्त झालेत आणि त्याचा संपूर्ण विभागाला आणि नागरिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे.