मुंबई : युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना मुंबई महापालिकेनं आज जोरदार झटका दिला. गुरुवारी, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नरीमन पॉईंटवर एक किलोमीटर अंतरावर दोन जीमचं उद्घाटन झालं होतं. त्यापैंकी एका जीमचा साचा महापालिकेनं उखडून टाकलाय. मात्र, ही गोष्ट समजल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून तातडीनं हालचाल करण्यात आल्या... आणि उखडून टाकलेल्या जीमच्या शेजारचाच दुसऱ्या जीमचा साचा मात्र उखडण्यापासून वाचलाय.
सिने तारकांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करून उघडलेलं रस्त्यावरचं जिम महापालिकेनं आज उखडून टाकलं. 'स्टे फिट मुंबई' या मोहीमेअंतर्गत जॅकलिन फर्नांडिझच्या उपस्थितीत मरीन ड्राईव्हवर या जिमचं उद्घाटन झालं होतं. आज महापालिकेनं हे जिम अनधिकृत ठरवून उखडून लावलंय.
दरम्यान, 'उखडलेली जीम पुन्हा लावण्यात आल्याची' सारवासारव युवा सेनेकडून करण्यात येतेय. महापालिका अधिकाऱ्यांच्या मिस कम्युनिकेशनमुळे हा घोळ झाल्याचं युवा सेनेकडून सांगण्यात येतंय. यासाठी युवासेनेनं काही फोटोही 'झी २४ तास'कडे पाठवले आहेत.
पण, 'झी २४ तास' रिपोर्टर्सच्या माहितीनुसार महापालिकेनं उखडलेली जीम पुन्हा जागेवर लावण्यात आलेली नाही. युवासेनेनं पाठवलेले फोटो पालिकेनं उखडलेल्या जीमच्या शेजारी एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि 'इंटरकॉन्टीनेटल' समोरच्या जीमच्या साच्याचे आहेत. हा जीमचा साचा महापालिकेनं काढलेलाच नव्हता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.