मुंबई : 25 जूनपासून लोकल पासात दुप्पट अशी वाढ होणार असल्याच्या भीतीपोटी त्यापूर्वीच पास काढून मोकळ्या झालेल्या प्रवाशांनी रेल्वेला रेकॉर्ड ब्रेक कमाई करून दिली आहे. 24 जून हा पास घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं अनेक प्रवाशांनी पास काढण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या. त्यामुळं याच दिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वेला मिळून 40 कोटी 71 लाख 99 हजार 200 रुपयांची कमाई करता आली.
तर मागील चार दिवसांतच या दोन्ही रेल्वेनं मिळून 70 कोटींची कमाई केल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं दरवाढीपूर्वी रेल्वे 'पास' झाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी भाडय़ात 100 टक्के वाढ करण्यात आली. त्यामुळं लोकलच्या पासात दुप्पट वाढ झाली. तर तिकीट दरात फक्त पाच रुपये एवढी अल्पवाढ होती. मात्र पासांत झालेल्या भरमसाट वाढीमुळं प्रवाशांचा खिसा कापला जाणार होता. 25 जूनपासून नवीन दरवाढ होणार असल्यानं आणि या दरवाढीमुळं खिसा कापला जाणार असल्यानं अनेकांनी 25 जूनपूर्वी पास काढण्यासाठी तोबा गर्दी केली.
21 जूनपासून पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांवर पास काढण्यासाठी गर्दी होऊ लागली. या दिवशी एक परिपत्रक काढून जुना आणि नवीन दरवाढीच्या पासातील फरक वसूल करणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र याला खुद्द प्रवाशांनीच विरोध केल्यानंतर हे परिपत्रक मागं घेऊन असा कुठलाही फरक वसूल न करता 25 जूनपासून नवीन दरवाढ केली जाईल आणि तत्पूर्वी जुन्याच दरानं पास वसूल केले जातील, असं रेल्वेनं स्पष्ट केलं. यानंतर 22 जूनपासून या दोन्ही रेल्वे मार्गावरील स्थानकांवर पास काढण्यासाठी गर्दी वाढू लागली.
24 जून रोजी तर ही गर्दी एवढी वाढली की अनेक स्थानकांवर पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नाही. पासांचे दर दुप्पट होणार असल्याच्या भीतीपोटी प्रवाशांनी पास काढण्यासाठी गर्दी केली. त्यामुळं रेल्वेनं यातून कमाई करण्यास सुरुवात केली. पश्चिम रेल्वेला 21 जूनला पास विक्रीतून 2 कोटी 20 लाख रुपये उत्पन्न मिळालं होतं, हेच उत्पन्न 24 जून रोजी वाढून 22 कोटी रुपये एवढं झालं.
तर मध्य रेल्वेनंही 21 जून रोजी 1 कोटी 62 लाख रुपयांची कमाई केली. हीच कमाई 24 जून रोजी 18 कोटी 71 लाख रुपयांवर जाऊन पोहोचली. या दोन्ही रेल्वेनं 21 जून ते 24 जून या चार दिवसांत एकूण 70 कोटी 32 लाख 26 हजार 720 रुपयांचं उत्पन्न कमावलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.