www.24taas.com, संजय पवार, झी मीडिया, सोलापूर
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंढरपूर आणि टेंभूर्णी शाखेला बनावट सोनं तारण ठेवून गंडवल्याचं समोर आल्यानं जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडालीय. बँकेच्या सराफानंच बँकेला गंडवलंय. हा प्रकार जिल्हा बँकेच्या तीन शाखेत झाल्याचं बोललं जात असलं तरी बँकांच्या इतर शाखेतही घोटाळा झाला असावा असा संशय व्यक्त केला जातोय.
सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यात छत्तीस शाखा आहेत. जिल्ह्यातल्या शेतक-यांचा या बँकेवर खूप मोठा विश्वास आहे. शेतक-यांना अडीअडचणीच्या वेळी सोनं तारण ठेवून पैसे मिळावेत म्हणून बँकेनं सोनं तारण विभाग सुरु केला होता.
तारण ठेवण्यात येणा-या सोन्याचं मुल्यानिर्धारित करण्यासाठी सराफाची नेमणूक केली जाते. जिल्हा बँकेच्या पंढरपूर आणि टेंभूर्णी शाखेत सराफ म्हणून गिरीश कटेकर यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र या सराफानंच बँकेत बनावट सोनं ठेवून कोट्यवधी रुपयांची रक्कम उचललीय. हा घोटाळा वरकरणी साठ लाखांचा दिसत असला तरी कोट्यवधींच्या घरात असावा असा संशय सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासद वसंत पाटील यांनी सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांनीही घोटाळा झाल्याचं कबुल केलंय. मात्र ही रक्कम वसूल करण्याची कारवाई सुरू असल्याचं सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दिलीप माने सांगितलंय.
जिल्हा बँकेत हा घोटाळा होवूनही सराफाला पैसे भरण्यास मुदत दिल्यानं जिल्हा बँकेच्या कारभारावर संशय व्यक्त केला जातोय. हा घोटाळा समोर येताच या सराफाला पोलिसांच्या हवाली करून कायदेशीर कारवाई करणं गरजेचं असतानाही सराफाला पैसे भरण्यास कालावधी का दिला जातोय असा प्रश्न सभासद विचारतायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.