सीरिज हारलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का. कॅप्टन फिंच झाला जखमी

भारताविरुद्धची टी-20 सीरिज ऑस्ट्रेलियानं गमावली आहे. पण त्यांच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

Updated: Jan 29, 2016, 09:30 PM IST
सीरिज हारलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का. कॅप्टन फिंच झाला जखमी title=

मेलबर्न : भारताविरुद्धची टी-20 सीरिज ऑस्ट्रेलियानं गमावली आहे. पण त्यांच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ऍरोन फिंच दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे भारताविरुद्धची तिसरी टी-20 तो खेळू शकणार नाही. 
याआधीच ऑस्ट्रेलियाचे स्टार बॅट्समन डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांना न्युझिलंड दौऱ्याआधी विश्रांती म्हणून दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 मधून वगळण्यात आलं, त्यातच आता फिंचही दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली आहे.

 
फिंचऐवजी वॉटसन कॅप्टन ?
31 जानेवारीला सिडनीमध्ये भारत-ऑस्ट्रेलियाची तिसरी टी-20 होणार आहे. या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व शेन वॉटसन करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टी-20 मॅचनंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यातही फिंचऐवजी वॉटसनच आला होता. तेव्हा फिंचच्या दुखापतीवर आम्ही नजर ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया वॉटसननं दिली.