'मेरा प्रेमपत्र पढकर...' म्हणत घ्या हृदयाची काळजी!

मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या काळात प्रेमपत्र लिहिणं म्हणजे जरा बोअरिंगच वाटणार! नाही? पण, जर तुमचं हृदय स्वस्थ ठेवायचं असेल तर हाच सल्ला तुम्हाला डॉक्टर देत आहेत. नुसता सल्लाच नव्हे तर यासाठी चक्क एका प्रेमपत्र लिहिण्याच्या स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 27, 2012, 03:27 PM IST

www.24taas.com, पुणे
मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या काळात प्रेमपत्र लिहिणं म्हणजे जरा बोअरिंगच वाटणार! नाही? पण, जर तुमचं हृदय स्वस्थ ठेवायचं असेल तर हाच सल्ला तुम्हाला डॉक्टर देत आहेत. नुसता सल्लाच नव्हे तर यासाठी चक्क एका प्रेमपत्र लिहिण्याच्या स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलंय.

पुण्यातील नॅचुरोपॅथी डॉ. श्रीकांत मुंदडा यांनी या स्पर्धेविषयी माहिती दिलीय. ‘हृदयमित्र’ या सामाजिक संस्थेद्वारे जानेवारी २०१३ मध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेची सुरुवात १९८५ मध्ये करण्यात आली होती. फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयोजित केल्या गेलेल्या या स्पर्धेत १६ ते ६० वर्षांपर्यंतच्या २२० तरुण हृदयांनी सहभाग घेतला होते. गेल्या २८ वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन होतंय. प्रत्येक पाच वर्षाला या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्रातील आयोजित केल्या जाणाऱ्या ‘स्वस्थ हृदय’ या अभियानासाठी ५२ वर्षीय मुंदडा प्रयत्नशील आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या अभियानांचा वापर केला जातो. ‘प्रेमपत्र लिहिणं’ हा त्याच अभियानाचा एक भाग आहे. ज्याचा आनंद प्रेमपत्र लिहिणाऱ्यालाही नक्कीच घेता येणार आहे.
चला! डॉक्टरांच्या साक्षीनं आता प्रेमाचा आणि हृदयाचा संबंध स्पष्ट झालाय, असं म्हणायला हरकत नाही. मग, तुम्हालाही हृदयासाठी आणि हृदयात राहणाऱ्या व्यक्तीसाठी प्रेम व्यक्त करायचंय आणि तेही एकाच वेळी तर तुम्हीही नक्की या स्पर्धेत भाग घ्या...