www.24taas.com, नवी दिल्ली
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठीच्या तरतुदीत १७ टक्क्यांनी वाढ केली आहे. मागच्या वर्षी संरक्षणासाठी तरतुद होती १,६४, ४१५ कोटी रुपये त्यात वाढ करुन ती १,९३,४०७ कोटी रुपये करण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षात संरक्षण खाते अनेक खरेदी व्यवहार करणार आहे त्यात भारतीय हवाईदलासाठी १२६ लढाऊ विमानांचा समावेश आहे. आधुनिक शस्त्रास्त्र आणि सामुग्रीच्या खरेदी साठी अर्थसंकल्पात ७९,५०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षात ज्या खरेदी व्यवहारांच्या करारांवर स्वाक्षरी होणं बाकी आहे त्यात सेनादलाच्या तीन्ही शाखांसाठी १२६ मीडियम मल्टी रोल लढाऊ विमाने, १४५ अत्याधुनिक लाईट होविट्झर विमाने, १९७ लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर तसंच अन्य शस्त्र सामुग्रीचा समावेश आहे. संरक्षणासाठी १,९३,४०७ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी ७९,५०० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत.
भारताने पुढच्या पाच ते दहा वर्षांसाठी संरक्षण खात्यासाठी शस्त्र, सामुग्रीच्या खरेदीसाठी १०० अरब डॉलरची योजना आखली आहे.