www.24taas.com, राजकोट
पंतप्रधान आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत, गुजरातमध्ये येत्या विधानसभा निवडणुकांत विजयाचा विश्वास, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. राजकोटमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत बोलताना त्यांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला.
महागाईबाबत केंद्र सरकार उदासीन असल्याचं सांगतानाच, भ्रष्टाचारामुळेच रुपयाची घसरण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. युपी सरकारच्या काळातच भ्रष्टाचारात वाढ झाली आणि विकासदराची घसरण झाल्याची टीकाही त्यांनी केलीय. काँग्रेसच्या सत्तेमुळे जनता निराश असल्याची टीकाही त्यांनी केलीय. विकासाचे राजकारण सोडणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिलीय.
आम्ही गुजरातमधील विधानसभा निवडणुकीतील विजयाबाबत प्रचंड आशावादी आहोत. गुजरातमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचारा खपवून घेतला जाणार नाही. कॉंग्रेसने जनतेची घोर निराशा केली आहे. गुजरातमधील विकास आणि प्रगती अन्य राज्यांसाठी आदर्श ठरली आहे, असेही मोदी म्हणाले.
देशातील नागरिक या सरकारला वैतागले आहेत. कॉंग्रेसचे नेते आणि मंत्र्यांकडे कोणत्याही समस्येवरील उपाय नाही, अशी टिका त्यांनी कॉंग्रेसवर केली.
दरम्यान, आजच्या बैठकीतही भाजपच्या पोस्टर युद्धाचे पडसाद उमटले. संजय जोशी यांच्या समर्थकांसह अन्य नेत्यांनीही नरेंद्र मोदी यांना टिकेचे लक्ष्य केले.