मुंबईतील डॉनकडून मला धोका - सलमान रश्‍दी

वादग्रस्त लेखक सलमान रश्‍दी यांनी आपली भारतभेट रद्द केली आहे. माझी हत्या करण्यासाठी मुंबईतील माफिया डॉनने दोन भाडोत्री गुंडांना शस्त्रे पुरवली असल्याचे मला सांगण्यात आले आहे, असे ट्‌विट केले आहे.

Updated: Jan 21, 2012, 08:51 AM IST

www.24taas.com, जयपूर

 

वादग्रस्त लेखक सलमान रश्‍दी यांनी आपली भारतभेट  रद्द केली आहे. माझी हत्या करण्यासाठी मुंबईतील माफिया डॉनने दोन भाडोत्री गुंडांना शस्त्रे पुरवली असल्याचे मला सांगण्यात आले आहे, असे ट्‌विट केले आहे.

 

जयपूर येथे पाचदिवसीय आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाला ते उपस्थित राहणार होते; मात्र त्यांच्या जिवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांनी दिल्यामुळे भारत भेट त्यांना रद्द करावी लागली. मात्र, या महोत्सवात 'व्हिडिओ'द्वारे आपण सहभागी होणार असल्याची माहिती रश्‍दी यांनी ट्‌विटरवर दिली आहे.

 

तुमची हत्या करण्यासाठी मुंबईच्या 'अंडरवर्ल्ड'मधील भाडोत्री मारेकरी जयपूरच्या मार्गावर आहेत,'अशी माहिती महाराष्ट्र आणि राजस्थानमधील गुप्तचर यंत्रणांनी मला कळवली आहे. गुप्तचर यंत्रणेच्या या माहितीच्या अचूकतेबद्दल माझ्या मनात काही शंका आहेत; मात्र असे असले तरी उद्भवलेल्या परिस्थितीत माझे महोत्सवाला येणे जोखमीचे ठरेल. माझ्या कुटुंबीयांसाठी, महोत्सवाला उपस्थित श्रोत्यांसाठी आणि माझ्या साहित्यिक सहकाऱ्यांसाठीही ते जोखमीचेच असेल. त्यामुळे माझा नियोजित जयपूर दौरा मी रद्द करत आहे, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

जयपूरमधील आयोजकांच्या विनंतीमुळे गेले अनेक दिवस मी या विषयाबाबत काही बोललो नव्हतो. साहित्य महोत्सवासाठी माझे येणे सुरक्षित कसे होईल, याचा चोख बंदोबस्त त्यांच्याकडून ठेवला जाईल, असे मला वाटत होते आणि त्यामुळेच मी एवढे दिवस मौन बाळगले होते,' असेही रश्‍दी यांनी निवेदनात म्हटले आहे. 'सॅटनिक व्हर्सेस' या साहित्यकृतीवरून गेल्या अनेक वर्षांपासून रश्‍दी कट्टरपंथीयांचे लक्ष्य बनले आहेत. 'दारुल उलूम देवबंद' या संघटनेने रश्‍दी यांच्या भारतभेटीला तीव्र आक्षेप घेतला होता.