www.24taas.com, नागपूर
नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई करून ऑक्सिटॉसिनच्या साठ्यासह एकाला अटक केलीय. गायी - म्हशींनी जास्त दूध द्यावं यासाठी हे रसायन इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातं. मात्र यामुळे दुधाचं सेवन करणा-यांच्या शरिरावर घातक परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
जास्त दूध मिळावं यासाठी गायींना इंजेक्शन देणा-या या व्यक्तीला हा प्रकार किती धोकादायक असेल याची कल्पना नसावी. मात्र हे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. शहरातल्या सतरंजीपूरा भागात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ऑक्सिटॉसिनचा मोठा साठा जप्त केलाय. या मागे आंतर राज्य टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ऑक्सिटॉसिनचा मानवी शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. इतकंच नव्हे तर गरोदर महिलांचा गर्भपातही होण्याची भीती असते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यताही डॉक्टरांनी वर्तवली. या प्रकरणातल्या टोळीचा छडा लवकर लागल्यास अनेक निष्पाप नागरिकांच्या प्रकृतीला असलेला संभाव्य धोका टळू शकेल.