साईंनाच भक्तांची काळजी

भारतात पहिल्यांदाच शिर्डीच्या साईबाबा मंदिरात ट्रॅवेलेटर्स किंवा सरकरणारे पदपथ बसवण्याची योजना आहे. विमानतळा प्रमाणेच सरकणाऱ्या पदपथांमुळे म्हणजेच ट्रॅवलेटॉर्समुळे साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या हजारो भाविकांना जलद गतीने आणि सुलभरित्या दर्शन घेता येईल.

Updated: Nov 9, 2011, 01:51 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

भारतात पहिल्यांदाच शिर्डीच्या साईबाबा मंदिरात ट्रॅवेलेटर्स किंवा सरकरणारे पदपथ बसवण्याची योजना आहे. विमानतळा प्रमाणेच सरकणाऱ्या पदपथांमुळे म्हणजेच ट्रॅवलेटॉर्समुळे साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या हजारो भाविकांना जलद गतीने आणि सुलभरित्या दर्शन घेता येईल.
या  प्रकल्पाचा अंदाजित खर्च ६० कोटी रुपये आहे. साईबाबांच्या मुख्य मंदिर संकुलापासून थोड्याच अंतरावर असलेल्या जून्या प्रसादालयाच्या इथे सरकणारे पदपथ बसवण्यात येणार आहेत. या ट्रॅवेलेटोर्समुळे दर्शनाला लागणाऱ्या वेळात एक तासाची बचत होणार आहे. ट्रॅवलेटॉर हा कनवेयर बेल्ट प्रमाणेच अनेक लोकांची वाहतूक करू शकतो तसंच उदवहनाप्रमाणे वर खालीही करु शकतो.

साईबाबांच्या दर्शनाला रोज सरासरी ५०,००० भाविक देश आणि परदेशातून येतात. भाविकांचा आकडा सण, सुट्टीच्या दिवसांमध्ये दहा पटीने वाढतो असं श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीचे अध्यक्ष जयंत ससाणे यांनी सांगितलं. साईबाबांच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणावर भाविक हजेरी लावत असल्याने मोठमोठ्या रांगा लागतात आणि दर्शनाला १०-१२ तासांचा कालावधी लागतो.

 

वयस्कर, आजारी आणि अपंग व्यक्ती तसंच गर्भवती महिलांना दर्शनासाठी तासनतास रखडावं लागतं. आता टॅवलेटॉर बसवल्यामुळे भाविकांच्या प्रत्येक बॅचमागे एक तासाने प्रतिक्षा समय कमी होईल असं ससाणे म्हणाले. ट्रॅवलेटॉर २५,००० भाविकांची वाहतूक सुरक्षितरित्या करु शकेल. या प्रकल्पासाठी मास्टर प्लान तयार करण्यासाठी आर्किटेक्ट हाफिझ कॉन्ट्रॅक्टर यांची नेमणुक करण्यात आली आहे. ट्रॅवलेटॉर्स बसवल्यामुळे भाविकांचे पावसाळ्याच्या दिवसात रक्षण करण्यासाठी बिल्डिंगवर शेड उभारण्याच्या खर्चात बचत होणार आहे तसंच स्वंयसेवकही कमी लागणार आहेत.