close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राज ठाकरे यांची ईडी चौकशी, मुंबईत चार ठिकाणी कलम १४४ लागू

मुंबई : कोहिनूर खरेदी कथीत गैरव्यवहार प्रकरणी आज राज ठाकरेंची ईडीच्या कार्यालयात चौकशी होणार आहे. आज सकाळी ११ वाजता राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. 

Aug 22, 2019, 11:29 AM IST

या कारवाईविरोधात बंद आणि इतर पद्धतीने निषेध करण्याचा इशारा इशारा मनसेने दिला होता. मात्र राज ठाकरेंनी शांतता बाळगण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना दिलंय. त्यामुळे कोणत्याही आंदोलनाची घोषणा करण्यात आली नसली तरी ऐनवेळी विरोध प्रदर्शन केला जाण्याची शक्यता आहे. 

1/4

ईडीच्या कार्यालयाला छावणीचं स्वरूप

राज ठाकरे आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी येणार आहेत. त्यासाठी ईडीच्या कार्यालयाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. परिसरात बॅरिकेडींग करण्यात आलंय. तसंच पोलिसांच्या अनेक गाड्या इथे आल्या आहेत. राज ठाकरे यांना चौकशीला बोलावण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय. बेस्ट बसेसनाही आज खिडक्यांना लोखंडी जाळी बसवण्यात आलीय. 

2/4

कडक कारवाईचा इशारा

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल, असे कोणतेही कृत्य मनसेच्या कार्यकर्त्यांनी करू नये, यासाठी मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा आणला तर कडक कारवाई केली जाईल अशा इशाराही पोलिसांनी दिला आहे. याआधी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

3/4

संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 

4/4

पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या सूचना

कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं काहीही करू नका नाही तर कारवाई केली जाईल अशा सूचना मनसे कार्यकर्त्यांना नोटिशीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. बुधवारी दुपारपासूनच पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. तसंच राज ठाकरे यांच्या घराबाहेरचा पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय.