Birthday Special: बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे जिने तिच्या करिअरच्या सुरुवातीला तब्बल 12 चित्रपटात एकाच हिरोसोबत काम केलं. तिने प्रेमासाठी तिचं टॉपला असलेलं करियर सोडलं. आज या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे.
1/10हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नीतू कपूर आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. निरागस हास्य, सहजसुंदर अभिनय आणि उत्साही नृत्यशैलीमुळे त्यांनी १९७० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
2/10बालकलाकार म्हणून सुरुवात करून स्टार अभिनेत्रीपर्यंतचा त्यांचा प्रवास तितकाच प्रेरणादायी ठरला. मात्र, ऋषी कपूर यांच्याशी विवाहानंतर त्यांनी कुटुंबाला प्राधान्य देत अभिनयातून दीर्घ विश्रांती घेतली.
3/10८ जुलै १९५८ रोजी दिल्लीतील पंजाबी शीख कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव हरनीत कौर होतं. लहानपणीच वडिलांचं निधन झाल्यानंतर आई त्यांना मुंबईत घेऊन आल्या आणि इथूनच त्यांच्या चित्रपटसृष्टीतील वाटचालीला सुरुवात झाली.
4/10केवळ आठव्या वर्षी त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्या 'बेबी सोनिया' आणि 'बेबी नीतू' या नावांनी ओळखल्या जात होत्या. १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या सूरज या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर दस लाख आणि दो कलियां या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. दो कलियांमधील दुहेरी भूमिकेमुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली.
5/10मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांनी रिक्शावालामधून नवी इनिंग सुरू केली. पुढे यादों की बारात, कभी कभी, दीवार, खेल खेल में, रफू चक्कर, अमर अकबर अँथनी, काला पत्थर आणि दूसरा आदमी यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आणि त्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या.
6/10नीतू आणि ऋषी कपूर यांची जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जाते. दोघांनी मिळून तब्बल १२ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. खेल खेल में, रफू चक्कर, कभी कभी, अमर अकबर अँथनी, दूसरा आदमी, दुनिया मेरी जेब में, जहरीला इंसान, जिंदा दिल, अनजाने में, झूठा कहीं का आणि धन दौलत या चित्रपटांमधील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली.
7/10२२ जानेवारी १९८० रोजी नीतू आणि ऋषी कपूर विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर त्यांनी अभिनयापासून दूर राहत कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला. जवळपास २६ वर्षांच्या विश्रांतीनंतर त्यांनी पुन्हा रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. लव्ह आज कल, दो दूनी चार, जब तक है जान, बेशरम आणि जुग जुग जियो या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पुन्हा एकदा उमटवली.
8/10आपल्या कारकिर्दीत त्यांनी ८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी फॅशन आणि ज्वेलरी डिझायनर आहे, तर मुलगा रणबीर कपूर हा आजच्या पिढीतील आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक आहे.
9/10रणबीर आणि आलिया भट्ट यांना राहा नावाची मुलगी आहे. रिद्धिमा यांचा विवाह उद्योगपती भरत साहनी यांच्याशी झाला असून त्यांना समारा नावाची मुलगी आहे.
10/10नीतू कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्यासह परवरिशसारख्या चित्रपटातही काम केलं असून अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी पडदा गाजवला. मात्र, ऋषी कपूर यांच्यासोबतची त्यांची जोडी आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी आणि प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक मानली जाते.