IPL 2025 : रोहित शर्मा सोबत कोण उतरणार ओपनिंगला? नव्या सीजनमध्ये अशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11
IPL 2025 Mumbai Indians : आयपीएल 2025 सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 22 मार्च पासून इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला सुरुवात होणार असून 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध नव्या सीजनमधील पहिला सामना खेळणार आहेत. मेगा ऑक्शननंतर मुंबई इंडियन्सच्या संघात अनेक बदल झाले असून काही जुन्या खेळाडूंची एक्सिट होऊन काही नव्या खेळाडूंची एंट्री झालीये. तेव्हा नव्या सीजनसाठी मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 कशी असेल याबाबत जाणून घेऊयात.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात आयपीएलच्या 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत. मात्र आयपीएल 2024 पूर्वी रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर करून हार्दिक पंड्याला संघाचं नेतृत्व देण्यात आलं. हार्दिकला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून संघात घेण्यात आलं होतं. त्याच्या नेतृत्वात मुंबईने चांगली कामगिरी केली नसली तरी त्याला पुन्हा एकदा आयपीएल 2025 मध्येही संघाचं नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या हाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे.


इंग्लंडचा स्टार फलंदाज विल जॅक हा रोहित शर्मा सोबत ओपनिंग बॅट्समन म्हणून आयपीएल 2025 मध्ये दिसू शकतो. विल जॅकने आरसीबीकडून खेळताना आयपीएल 2024 मध्ये फलंदाजीत दमदार कामगिरी केली होती. युवा फलंदाज नमन धीर याने गेल्यावर्षी आपल्या फलंदाजीतील परफॉर्मन्सने सर्वांना इम्प्रेस केलं होतं. त्यामुळे नमन धीर हा मुंबईकडून तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे.



मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या हा नंबर 6 वर फलंदाजीसाठी उतरू शकतो. हार्दिक पंड्या हा फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही माध्यमातून संघासाठी योगदान देतो. मागच्या सीजनमध्ये त्याला चांगल्या धावा करण्यात यश आलं नसलं तरी यंदा तो आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने सर्वांना इम्प्रेस करेल असं म्हटले जातं आहे.




स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असून तो बंगळुरूच्या रिहॅब सेंटरमध्ये उपचार घेत आहे. काही दिवसांपासून त्याने सरावाला सुरुवात केली असली तरी नव्या सीजनमधील सुरुवातीच्या काही सामन्यांना तो मुकू शकतो. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तो आयपीएल सामन्यांमध्ये पुनरागमन करेल असं म्हटलं जात आहे.
