मुंबईचे स्ट्रीट फूड पाचव्या क्रमांकावर; एकदा तरी 'या' पाच पदार्थांचा आस्वाद घ्याचं!

भारताची आर्थिक राजधानी मुंबईने पुन्हा एकदा आपल्या खास वैशिष्ट्याने जगभरात आपला ठसा उमटवला आहे. यावेळी गोष्ट सिनेसृष्टी किंवा आर्थिक विकासाशी संबंधित नसून, खाद्यप्रेमींसाठी आहे. 2024-25 टेस्ट अॅटलस अवॉर्ड्सच्या 'वर्ल्ड्स बेस्ट फूड सिटी'च्या यादीत मुंबईला पाचवा क्रमांक मिळाला आहे. हे स्थान मुंबईने इटलीतील नेपल्स, मिलान, बोलोग्ना आणि फ्लॉरेन्स या खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध शहरांच्या नंतर मिळवले आहे.    

| Dec 14, 2024, 16:55 PM IST
1/7

Taste Atlas (एक जागतिक दर्जाचे खाद्य आणि प्रवास मार्गदर्शक) ने आपल्या मोठ्या डेटाबेसच्या आधारे ही रँकिंग प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 17,073 शहरे, 15,478 पदार्थ आणि 4,77,287 वैध खाद्य पुनरावलोकनांचा समावेश करण्यात आला होता. विविध चवी, स्ट्रीट फूड संस्कृती आणि खाद्यपदार्थांच्या विविधतेमुळे मुंबईला हा बहुमान मिळाला आहे. मुंबईचे स्ट्रीट फूड हे फक्त भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप लोकप्रिय आहे. चला तर मग, मुंबईतील पाच सर्वोत्तम स्ट्रीट फूड्स जाणून घेऊया, जे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी चाखलेच पाहिजेत.  

2/7

1. पावभाजी

मुंबई म्हटले की पावभाजी आठवल्याशिवाय राहणारच नाही. बटरमध्ये भाजलेले मऊ पाव आणि मसालेदार, तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी हा पदार्थ प्रत्येक वयोगटातील लोकांना प्रिय आहे. रस्त्यांवरील स्टॉल्सपासून मोठ्या हॉटेल्सपर्यंत सर्वत्र पावभाजी मिळते आणि तिची चव प्रत्येक वेळी वेगळीच अनुभवायला मिळते.  

3/7

2. भेळपुरी

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया किंवा जुहू बीचवर भेळ खाण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. कुरमुरे, चटपटीत चटण्या आणि मसाल्यांनी सजलेली ही भेळ फक्त मुंबईकरच नाही तर पर्यटकांनाही भुरळ घालते. भेळपुरी ही केवळ खाद्यपदार्थ नाही, तर मुंबईच्या आठवणी जिवंत ठेवणारा आनंद आहे.    

4/7

3. रगडा पॅटीस

रगडा पॅटीस हा मसालेदार आणि आंबट-गोड पदार्थ आहे जो बटाट्याच्या टिक्की आणि पांढऱ्या वाटाण्याच्या रगड्याने बनतो. त्यावर घातलेली हिरवी चटणी  आणि गोड चटणी पदार्थाला अधिक चवदार बनवते. स्ट्रीट फूड जॉईंट्समध्ये मिळणारा हा पदार्थ मुंबईकरांची आवड आहे.  

5/7

4. बोम्बे बिर्यानी

मुंबईतील बिर्यानी तिच्या खास चवीसाठी ओळखली जाते. सुगंधी मसाले, मऊ भात आणि साजूक तुपात बनवलेली बिर्यानी प्रत्येक हॉटेलमध्ये वेगळी चव देते. लहान ढाब्यांपासून मोठ्या हॉटेल्सपर्यंत सगळीकडे उपलब्ध असलेली ही बिर्यानी एकदा तरी चाखायलाचं हवी.  

6/7

5. थालीपीठ

जर तुम्हाला पारंपरिक आणि आरोग्यदायी जेवण आवडत असेल, तर थालीपीठ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. हे महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ असून, अनेक धान्य, डाळी आणि मसाल्यांपासून बनवले जाते. चटणी किंवा लोणीसोबत खाल्ले जाणारे थालीपीठ प्रत्येकाच्या आवडीनुसार बदलते आणि प्रत्येक चवीला तृप्त करते.    

7/7

मुंबई फक्त आर्थिक राजधानी नसून खाद्यसंस्कृतीसाठीही जगभर प्रसिद्ध आहे. येथील स्ट्रीट फूड ही एक सांस्कृतिक ओळख बनली आहे. पाचव्या क्रमांकावर झळकलेल्या या शहराच्या रस्त्यांवरील खाद्यपदार्थांची चव घ्यायची असेल तर मुंबईचा प्रवास नक्की ठरवा.