महाभारत युद्धानंतर फक्त एका रात्रीसाठी पुनरुज्जीवित झाले होते योद्धा... भीमाला घट्ट मिठी मारून दुर्योधन काय म्हणालेला?

Mahabharata Story: पौराणिक कथांमध्ये नमूद असणाऱ्या संदर्भांनुसार महाभारत युद्धानंतर नेमकं काय घडलं याचा उलगडा... पाहून आश्चर्य वाटेल...   

सायली पाटील | Updated: Mar 18, 2025, 03:03 PM IST
महाभारत युद्धानंतर फक्त एका रात्रीसाठी पुनरुज्जीवित झाले होते योद्धा... भीमाला घट्ट मिठी मारून दुर्योधन काय म्हणालेला?
Mahabharata Story What happened when all the warriors were resurrected for one night know the mythical story

Mahabharata Story: पौराणिक कथांमध्ये नोंद असणाऱ्या महाभारत युद्धाविषयी सांगताना कायमच 'महाभारत' या महायुद्धाची नोंद केली जाते आणि हे असं युद्ध कधीही होऊ नये असंच म्हटलंही जातं. असंख्य योद्ध्यांच्या प्राणाहुतीमुळं हे युद्ध चर्चेत राहिलं असून असं म्हणतात की देशातील कैक संस्थानच्या राजांचा या युद्धात सहभाग होता. कुरुक्षेत्रावर लढल्या गेलेल्या या युद्धानं कौरवांचा सर्वनाश झाला होता. तर, पांडवांच्या पारड्यात विजय पडूनही झालेलं नुकसान त्यापेक्षा कैक पटींनी मोठं होतं. 

विष्णुधर्मोत्तर पुराणानुसार महाभारत युद्धसमाप्तीनंतर सर्व मृतक योद्धे एका रात्रीसाठी पुनरुज्जीवित झाले होते. त्यावेळी अतिशय भावस्पर्शी वातावरण पाहायला मिळालं. यजनश्री या X अकाउंटवरील माहितीनुसार 18 दिवसांनतंर महाभारत युद्धाची सांगता झाली खरी, पण त्यानंतर मात्र कुरुक्षेत्रावर सर्वत्र विनाशपर्व पाहायला मिळालं. मृतदेहांचा खच तिथं पडला होता. युद्धिष्ठीराकडे राजेपद आलं पण, इथं प्रसन्न भाव मात्र कुठेही नव्हता. आपल्या माणसांना गमावल्याचं प्रचंड दु:ख त्याच्या मनात होतं. मनात असणारी ही खंत पाहता त्यानं अखेर युद्धात धारातीर्थी पडलेल्या सर्वांसाठीच पिंडदान करण्याचा निर्णय घेतला. 

या कार्यासाठी गंगाकिनारी जात त्यानं विधीवत पूजाअर्चा आणि पिंडदानास सुरुवात केली. त्याक्षणी काळ, ऋषी आणि ब्राह्मणांनी त्यांना माहिती दिली युद्धात मारले गेलेल सर्व योद्धे पितृलोकात गेले असले तरीही आप्तेष्ठांना भेटण्याची त्यांची अखेरची इच्छा आहे. पांडवांनी यानंतर श्रीकृष्णाचा सल्ला घेतला. यावर हे शक्य असल्याचं म्हणत तुम्हाला माता गंगेची परवानगी घ्यावी लागेल असं त्यांनी पांडवांना सांगितलं आणि त्यांनी लगेचच गंगामातेची आराधना केली. 

सर्वांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले... 

गंगामातेची कृपा आणि श्रीकृष्णाच्या दिव्य शक्तीच्या बळावर कुरुक्षेत्रावर अचानक सारंकाही वास्तवात उभं राहिलं. मारले गेलेले योद्धे क्षणात जीवंत झाले. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन, जयद्रथ, अभिमन्यु, शल्य, शकुनि आणि इतर हजारो योद्धे मूळ रुपात आले. त्यांचं शरीर दिव्य तेजानं झळालत होतं. याच क्षणी पांडव आणि त्या मृत आणि पुनरुज्जीवित झालेल्या योद्ध्यांच्या भेटीचा क्षण अत्यंत हृदयस्पर्शी होता. 

पांडव आणि कौरव एकमेकांना मिठी मारून रडत होते. कोणाच्याही मनात सूडाग्नी नव्हता. हो, पण प्रेम आणि क्षमाभाव मात्र तिथं प्रत्येकाच्याच मनात होता. पितामह भीष्म यांनी तिथं मनात खंत असणाऱ्या युधिष्ठिराला आशीर्वात देत त्यानं काहीच चुकीचं केलं नसल्याची समजूत काढत हे धर्माच्या (सत्याच्या) रक्षणासाठी महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. कर्णानं अर्जुन आणि कुंतीशी सद्भावे वार्तालाभ केला कुंतीनंही आपल्या या आद्य पुत्राची क्षमा मागितली. अभिमन्यूनं तिथं पिता अर्जुन, माता सुभद्रा यांची भेट घेतली, मुलाला घट्ट मिठी मारताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. 

गुरूवर्य द्रोणाचार्य यांनी अश्वत्थामाला मिठी मारत सन्मार्गाची निवड करण्याचा सल्ला त्याला दिला. दुर्योधनाच्या अश्रूंनाही यावेळी आवर घालता येत नव्हतं. त्यानं भीमाला घट्ट मिठी मारून आपल्या अक्षम्य चुकांसाठी क्षमा मागितली होती. आपण सर्व वैरभावना दूर ठेवत आता शांत चित्तानं ईश्वरचरणी विलीन होत असल्याचं त्यानं भीमाला सांगितलं. 

योद्ध्यांचं कुरुक्षेत्रावरील हे पुनरुज्जीवन अवघ्या एका रात्रीचं असून सूर्याचं पहिलं किरण पृथअवीला स्पर्शताच सर्व योद्धे एका दिव्य प्रकाशात परावर्तित होत स्वर्गाच्या दिशेनं गेले. या सर्व प्रसंगी श्रीकृष्ण मात्र शांत होते... ही सर्व कर्माची फळं असून हीच नियती आहे आणि हेच विधीलिखित होतं हे ते जाणत होते. पांडवांनी युद्धानंतर काही वर्षांनी राज्य सांभाळलं पण, कालांतरानं त्यांनी पुढच्या पिढीकडे हा राज्यकारभार सोपवत हिमालयाच्या दिशेनं वाटचाल केली आणि तेसुद्धा सृष्टीत विलीन झाले. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)