)
Jemimah Rodrigues, ICC Women World Cup Semi-Final: मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर इतिहास घडला. भारतीय संघाच्या स्टार बॅटर जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद 127 धावा करत भारताला महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम फेरीत पोहोचवलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा विजय केवळ क्रिकेटमधील नाही, तर एका स्वप्नपूर्तीची कहाणी होती त्या मुलीची जी आठ वर्षांपूर्वी आपल्या संघाचं स्वप्न डोळ्यांत घेऊन उभी होती. 2017 मध्ये जेव्हा भारत इंग्लंडकडून विश्वचषक अंतिम फेरीत पराभूत झाला, तेव्हा फक्त 16 वर्षांची जेमिमा मुंबई विमानतळावर चाहत्यांच्या गर्दीत उभी होती. त्या दिवशी पराभव असूनही भारतीय संघाचं झालेलं स्वागत तिने पाहिलं आणि मनात स्वतःला एक वचन दिलं की, “एक दिवस मी या संघाला विजयी करणार.”
भारतासमोर 339 धावांचं भलीमोठं लक्ष्य होतं. स्मृती मंधाना (24) आणि शफाली वर्मा (10) लवकर परतल्यावर स्कोअरबोर्डवर 59/2 अशी चिंताजनक स्थिती होती. तेव्हाच जेमिमाला अनपेक्षित निर्णयानुसार क्रमांक 3 वर पाठवलं गेलं. शांत आत्मविश्वासाने ती मैदानात उतरली. “मी शॉवरमध्ये होते आणि अचानक मला सांगितलं की तू नंबर तीनवर खेळणार आहेस,” जेमिमाने सामना संपल्यावर सांगितलं. “मी फक्त एवढंच म्हटलं, ‘थांब, देव लढणार आहे.’” आणि मग सुरू झाला भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात अप्रतिम खेळपट्टीवरील प्रवास. जेमिमाची नाबाद 127 धावांची खेळी 134 चेंडूंत 14 चौकारांसह केवळ तंत्र आणि टायमिंगचं प्रदर्शन नव्हतं, तर अढळ मानसिक ताकदीचं प्रतीक होतं.
हर्मनप्रीत कौरसोबत तिने 167 धावांची निर्णायक भागीदारी रचली. हर्मनप्रीतनेही 88 चेंडूंवर 89 धावा केल्या. या दोघींनी भारताच्या विजयाचा पाया रचला. शेवटी भारताने 48.3 षटकांत 341/5 अशी ऐतिहासिक धावसंख्या गाठली महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी धाव पाठलाग. तथापि, जेमिमाचा या क्षणापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. सामन्यानंतर ती भावुक झाली. “गेल्या काही महिन्यांत मी दररोज रडायचे. फॉर्म गेल्यामुळे स्वतःवर विश्वासच राहिला नव्हता. शेवटी जेव्हा मी काहीच करू शकले नाही, तेव्हा देवाने माझ्यासाठी सगळं केलं,” तिने सांगितलं.
Everyone is appreciating Jemimah Rodrigues and Harmanpreet Kaur for their brilliant innings vs AUS
— Richard Kettleborough (@RichKettle07) October 31, 2025
But, no one is talking about, Richa Ghosh - 26(16) and Amanjot Kaur - 15*(8), which gave comfort to Jemimah
- What's your take #INDWvsAUSW pic.twitter.com/K9gIEHxZtG
तिने पुढे म्हटलं, “मी एकटी काही केलं नाही. जेव्हा मी थांबले, तेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी मला पुढे ढकललं.”
दीप्ती शर्मा (24), ऋचा घोष (26) आणि अमनजोत कौर (15*) यांनी दिलेल्या छोट्या पण महत्वाच्या खेळींनी गती कायम ठेवली. पण जेमिमाची शांतता आणि धीर हाच भारताच्या स्वप्नरनचा आधार ठरला. तिच्या या नाबाद शतकासाठी तिला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवडलं गेलं. “गेल्या चार महिने अतिशय कठीण गेले, पण आज असं वाटतंय की हे सगळं एक स्वप्नच आहे,” जेमिमा हसत म्हणाली.
जेमिमा मैदानात उभी असताना, हातात तिरंगा फडकवत, त्या 2017 च्या विमानतळावरील क्षणाची आठवण सर्वांना झाली. जेव्हा एका छोट्या मुलीने पराभवातही प्रेरणा पाहिली होती. आज तीच मुलगी भारताच्या विजयाची ओळख बनली आहे.