)
Amit Mishra Net Worth: भारतीय लेगस्पिनर अमित मिश्रा यांनी अखेर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दोन दशकांपेक्षा जास्त काळ चाललेला त्यांचा क्रिकेट प्रवास आता थांबला आहे. 42 वर्षीय मिश्रा यांनी 2017 साली आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर ते घरगुती स्पर्धा आणि आयपीएलमध्ये सातत्याने सक्रिय राहिले. करिअरमध्ये अनेक विक्रम त्यांच्या नावावर झाले आणि त्याचसोबत त्यांनी चांगली कमाईही केली. आज त्यांच्या संपत्तीची गणना कोट्यवधी रुपयांत होते. चला पाहूया क्रिकेट मैदानावर जादू दाखवणाऱ्या आणि लक्झरी कारांचा शौक बाळगणाऱ्या अमित मिश्रा यांच्या नेटवर्थविषयी...
अमित मिश्रा यांनी भारतासाठी 22 कसोटी, 36 एकदिवसीय आणि 10 टी20 सामने खेळले असून त्यात त्यांनी एकूण 156 बळी घेतले. मोहालीत 2008 मध्ये झालेल्या कसोटी पदार्पणात त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 विकेट घेत आपली ताकद दाखवली. टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या अनेक कामगिरी त्यांच्या नावावर आहेत. आयपीएलमध्ये तर मिश्रा यांनी इतिहास रचला आहे. लीगमधील एकमेव गोलंदाज म्हणून तीन वेळा हॅट्रिक घेण्याचा मान त्यांना मिळाला. 162 आयपीएल सामन्यांतून त्यांनी 174 विकेट्स घेतल्या असून ते स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक मानले जातात.
2013 च्या आयपीएलमधील चमकदार प्रदर्शनामुळे त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वनडे संघात स्थान मिळाले. त्या मालिकेत त्यांनी 5 सामन्यांत तब्बल 18 विकेट्स घेतल्या. पुढे 2014 च्या टी20 वर्ल्डकपमध्ये त्यांनी 10 बळी घेत भारताला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
माध्यमांच्या अहवालानुसार अमित मिश्रा यांची नेटवर्थ अंदाजे 45 कोटी रुपये आहे. त्यातील मोठा भाग आयपीएलमधील दीर्घ कारकीर्दीतून आला आहे. याशिवाय ते टीम इंडियासाठी खेळताना मिळालेलं मानधन, जाहिराती आणि गुंतवणूक यांमधूनही मोठी कमाई करतात.
अमित मिश्रा यांना कार्सची प्रचंड आवड आहे. त्यांची पहिली गाडी सिल्व्हर रंगाची Maruti Esteem होती, जी त्यांनी पहिल्या आयपीएल करारातून मिळालेल्या पैशांत घेतली होती. ही कार आजही त्यांच्या कलेक्शनमध्ये आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये पांढऱ्या रंगाची Mercedes GLC Coupe AMG, Honda Accord, Toyota Fortuner, Honda City आणि Hyundai Santro अशा गाड्या आहेत. भविष्यात Rolls-Royce घेण्याचं स्वप्न ते पाहतात.